जळगावात लाच प्रकरणात अडकलेल्या अधिकार्‍यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले अडीच किलोंचे दागिन्यांसह कोट्यवधींचे घबाड


जळगाव (गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026) : जळगावात जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे यांना दहा हजारांच्या लाच प्रकरणात अटक केल्यानंतर एसीबीने घेतलेल्या झाडाझडतीत अधिकार्‍याच्या घरासह बँक लॉकरमधून कोट्यवधी रुपयांचे घबाड जप्त करण्यात आले.

कोट्यवधींचे घबाड आढळल्याने अधिकारीही थकक
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. या कारवाईनंतर त्यांच्या घराची आणि बँकेतील लॉकरची झडती घेतली असता तब्बल पाच कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे. यामध्ये सात लाख 97 हजार 920 रुपयांची रोकड, एक कोटी दहा लाखांची दोन घरे, 19 लाख 53 हजार 991 रुपये किंमतीचे 11 हजार 633 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि तीन लाख 55 हजार 286 रुपये किंमतच्या प्लॉटिनमच्या दागिन्यांचा समावेश आहे.









सतीश शिसोदेंना पोलीस कोठडी
सतीश मन्सुलाल शिसोदे (55) हे जिल्हा परिषद बांधकाम विभागात वर्ग-1 चे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 2 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध सापळा रचून कारवाई केली होती. यावेळी सहकारी अभियंत्यासह 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात त्यांना पकडण्यात आले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्याकलम 7 आणि 12 अन्वर्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने शिसोदे यांना 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

झडतीत काय-काय सापडलं?
पथकाने शिसोदे यांच्या निवासस्थानी झडती घेतली. या झडतीत 7 लाख 97 हजार 920 रुपर्य रोख रक्कम आढळून आली. याशिवाय आदर्शनगर परिसरातील त्यांच्या मालकीच्या दोन घरांची माहिती समोर आली. पहिल्या घराची किंमत 45 लाख रुपये, तर दुसर्‍या घराची किंमत 65 लाख रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर मौल्यवान वस्तूंची अंदाजित किंमत 24 लाख 39 रुपये आहे. अशाप्रकारे केवळ घर झडतीत 1 कोटी 41 लाख 97 हजार 959 रुपयांचा मु्द्देमाल आढळून आला.

बँकेच्या लॉकरमध्ये घबाड सापडलं
शिसोदे यांच्या जळगाव सहकारी बँकेतील लॉकरची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने आढळून आले. यामध्ये 2524.18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, पट्ट्या, चैन, पेंडल, लॉकेट आणि बांगड्यांचा समावेश आहे. या सोन्याची किंमत 3 कोटी 51 लाख9 हजार 153 रुपये इतकी आहे. तसेच लॉकरमध्ये 11 हजार 633.7 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू आणि दागिने आढळले. यामध्ये चांदीची बिस्किटे, वाट्या, ताटे आणि इतर वस्तूंचा समावेश असून, त्यांची किंमत 19 लाख 53 हजार 991 रुपये आहेत.

याशिवाय 101.02 ग्रॅम वजनाचे प्लॅटिनमचे दागिनेही मिळून आले. त्यांची किंमत 3 लाख 55 हजार 286 रुपये आहे. बँक लॉकरमधील या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत तीन कोटी 74 लाख 90 हजार 430 रुपये इतकी आहे.

घर झडती आणि बँक लॉकरच्या तपासणीत मिळालेला सर्व मु्द्देमाल एकत्रित केल्यानंतर त्याची किंमत पाच कोटी 16 लाख 88 हजार 389 रुपये इतकी झाली आहे. अवघ्या दहा हजार रुपयांच्या लाच प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर अधिकार्‍याच्या घरात आणि बँक लॉकरमध्ये कोट्यावधींची मालमत्ता आढळल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. अधिकार्‍यांकडून आता आरोपींने कुठल्या मार्गाने ही अवैध संपत्ती जमा केली? याची कसून तपासणी केली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !