वर्षभरापूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हनी ट्रॅप ; वरणगावनजीक तरुणाला बोलावत झाडल्या गोळ्या : जळगाव गुन्हे शाखेने केली एका ‘क्लू’ने गुन्ह्याची उकल
जळगाव (गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026) : एक वर्षांपूर्वी झालेल्या किरकोळ अपघातात संशयीतांनी मारहाण करीत व्हिडिओ काढल्याचा बदला घेण्यासाठी फेकरी, ता.भुसावळ येथील दोघांनी मुक्ताईनगरातील डंपर चालकावर हनी ट्रॅप आणला. फेक अकाउंटद्वारे तरुणाशी सलगी वाढवत त्यास वरणगावजवळील उड्डाणपुलाखाली बोलावले व नंतर गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडून व मारहाण करून आरोपींनी पळ काढला. अतिशय गुंतागुंतीच्या या गुन्ह्याची जळगाव गुन्हे शाखेने एका क्लूद्वारे उकल करीत दोन आरोपींना अटक केली. भुसावळातील मृत गुन्हेगार सागर कहारकडून आरोपीकडे हा कट्टा आल्याची माहितीही तपासातून समोर आली.
असे आहे गोळीबार प्रकरण
1 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता मुक्ताईनगरच्या काझीपुरा परिसरातील सरफराज सय्यद सकिर सय्यद (24) या डंपर चालकाला इन्स्टाग्रामवरील अश्विनी नामक तरुणीच्या नावाने तयार केलेल्या इन्स्टाग्राम खात्यावरून मेसेज करून सलगी वाढवण्यात आली. तरुणाला वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर भेटण्यासाठी बोलावण्यात आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर लोखंडी सळईने हल्ला चढवला. डोक्यावर सलग दोन वार करून त्याला खाली पाडण्यात आले तसेच पायावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यानंतर एका आरोपीने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून सरफराजवर दोन राऊंड गोळीबार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.








एका क्लूने झाली गुन्ह्याची उकल
जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. हल्ल्यानंतर अवघ्या 45 मिनिटांत संबंधित इन्स्टाग्राम खाते डिलीट किंवा निष्क्रिय करण्यात आले होते. मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या खात्याच्या वापरासाठी आरोपी भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे याने आपल्या अल्पवयीन मित्राच्या मोबाईलमधील ई-मेलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे (20, रा.फेकरी, ता.भुसावळ) व सिद्धार्थ रामदास ढिवरे (27, रा. फेकरी, ता.भुसावळ) या दोघांना अटक केली. आरोपी भूषण बारावी शिक्षित असून सिद्धार्थ बी.ए. पदवीधर असून ग्रामपंचायत सबकंत्राटदार म्हणून काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वर्षभरापूर्वी मारहाणीचा घेतला बदला
जळगाव पोलिसांच्या चौकशीत या हल्ल्यामागील धक्कादायक कारण समोर आले. 18 एप्रिल 2021 रोजी बोदवड-मुक्ताईनगर महामार्गावर वाहनाच्या अपघातादरम्यान सिद्धार्थ ढिवरे आणि भूषण सावळे यांचा सरफराज सय्यद व त्याच्या मित्रांशी वाद झाला होता. या वादातून सरफराज आणि त्याच्या साथीदारांनी आरोपींच्या वाहनाची तोडफोड करून त्यांना काठ्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओही तयार करण्यात आला होता. त्यावेळी झालेला अपमान आरोपींच्या मनात कायम होता. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी पोलिसांत तक्रार न देता सरफराजवर हल्ला करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. तरुणाला बोलावल्यानंतर लोखंडी सळईने डोक्यावर वार करून खाली पाडण्यात आले व त्यानंतर भूषणने गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भूषणने मोबाईलमधील इन्स्टाग्राम खाते तातडीने निष्क्रिय करण्यात आले.
यांनी केली क्लीष्ट गुन्ह्याची उकल
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे, संतोष पवार आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, एलसीबीचे विनोद पाटील, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, श्रीकृष्ण देशमुख, प्रेम सपकाळे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, रतन गीते, ईश्वर पाटील, विलास गायकवाड, मिलिंद जाधव, गौरव पाटील, बाबासाहेब पाटील आदींच्या पथकाने केली.