भुसावळ तालुका पोलिसांची एमडी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई : भुसावळसह कंडारीतील चौघांकडून 62.21 ग्रॅम मेफेड्रोन जप्त

दोन दुचाकींसह चार मोबाईल मिळून सात लाख 28 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त


भुसावळ (शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026) : जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणार्‍यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. भुसावळ तालुका पोलिसांनी किन्ही एमआयडीसी परिसरात छापा टाकून मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाच्या साठ्यावर कारवाई केली. शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.55 वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी 62.21 ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. या प्रकरणी कंडारीसह भुसावळातील चौघांना अटक करण्यात आली. या कारवाईत दोन मोटारसायकली आणि चार मोबाईल हँडसेटसह एकूण सात लाख 28 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

चौघांना अटक
या प्रकरणी ऋषभ कुणाल खेडकर (18, रा.कंडारी, भुसावळ), प्रथमेश दिलीप आव्हाड (27, रा.दादासाहेब रुपवते सोसायटी, भुसावळ), शेख अफजल शेख रहेमतुल्ला (26, रा.नसरवांजी फाईल, भुसावळ) आणि असगरखान अनवरखान (57, रा.अयान कॉलनी, भुसावळ) यांना अटक करण्यात आली.









अडीच लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त
तालुका पोलिसांनी केलेल्या झडतीत एकूण 62.21 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडर मिळून आली. त्याची किंमत दोन लाख 48 हजार 840 रुपये आहे. यापैकी 55.33 ग्रॅम एमडी असगरखान याच्याकडून जप्त करण्यात आले. याशिवाय रॉयल एनफिल्ड बुलेट आणि पल्सर अशा दोन मोटारसायकली (किंमत तीन लाख 25 हजार रुपये) तसेच आयफोन 16, आयफोन 13, टेक्नो आणि रेडमी कंपनीचे चार मोबाईल (किंमत एक लाख 55 हजार रुपये) जप्त करण्यात आले आहेत. एकूण सात लाख 28 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 226/2026 अन्वये एनडीपीएस कायदा कलम 8(क), 22(क) आणि 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थांची विक्री व ताबा यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, भुसावळ पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या नेतृत्वात भुसावळ तालुक्याचे परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह भुसावळ तालुका पोलिसांनी केली.

कारवाईने उडाली खळबळ
जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणार्‍यांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाई तीव्र केली असून, या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला बळ मिळाले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !