धरती माँ के नाम एक पत्र’ अभियानातून 300 विद्यार्थ्यांनी व्यक्त केली पृथ्वीमातेप्रती कृतज्ञता !

डी.एस.देशमुख विद्यालयात 24 ते 30 ऑक्टोबरदरम्यान ‘ढाई आखर’ राष्ट्रीय पत्रलेखन उपक्रम : पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग


थोरगव्हाण, ता.रावेर (रविवार, 8 नोव्हेंबर 2026) : पर्यावरणाचे संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि पृथ्वीमातेप्रती कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने भारतीय डाक विभाग, भुसावळ विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या ‘ढाई आखर – 2026-27’ राष्ट्रीय पत्रलेखन अभियानाला थोरगव्हाण येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण संचलित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. 24 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला.

300 विद्यार्थ्यांचे पत्रलेखक
विद्यालयातील पाचवी ते बारावीच्या सुमारे 300 विद्यार्थ्यांनी ‘धरती माँ के नाम एक पत्र’ या विषयावर पत्रलेखन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमांतर्गत पोस्ट कार्यालय, थोरगव्हाण यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना आंतरदेशीय पत्रे मोफत उपलब्ध करून देण्यात आली. पोस्टमास्तर अरमान तडवी यांच्या देखरेखीखाली पाचवी ते बारावीच्या सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांना या पत्रांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पृथ्वीमातेच्या संरक्षणाविषयी आपले विचार, भावना आणि पर्यावरण रक्षणासाठीचे संकल्प पत्रलेखनातून व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी लिहिलेली सर्व पत्रे परीक्षणासाठी मुंबई येथे पाठविण्यात आली आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणार्‍या पत्रलेखनासाठी योग्य ती पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

या उपक्रमासाठी प्रकल्पप्रमुख म्हणून ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाढते प्रदूषण, वृक्षतोड, जलसंकट, हवामान बदल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन यांसारख्या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा देत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी के. पी. चौधरी, एम. के. पाटील, एन. बी. चौधरी, एन. ए. देशमुख आणि के. एम. पाटील यांनी विशेष सहकार्य केले. तसेच पोस्टमास्तर अरमान तडवी, पोस्टमन हितेश इंगळे व त्यांच्या सहकार्‍यांचे मोलाचे योगदान लाभले.

आजच्या डिजिटल युगात पत्रलेखनाची परंपरा जपण्याबरोबरच विद्यार्थ्यांना सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नांबाबत विचारप्रवृत्त करणारा हा उपक्रम ठरला. केवळ पृथ्वीमातेविषयी भावना व्यक्त न करता तिच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने कृतीशील होण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या लेखनातून दिला. भारतीय डाक विभाग आणि विद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला वाव देणारा आणि पर्यावरणविषयक जाणीव समृद्ध करणारा ठरला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !