वैनगंगा नदीकाठी एअर होस्टेसवर जीवघेणा हल्ला ; पुण्यात कार्यरत वर्षा तुरकर यांचा मृत्यू
बालाघाट/गोंदिया (सोमवार, 16 नोव्हेंबर 2026) : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त माहेरी आलेल्या आणि पुण्यात एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या 35 वर्षीय वर्षा तुरकर यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. मित्रासोबत फिरण्यासाठी वैनगंगा नदीच्या किनारी गेलेल्या वर्षा यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी नातेवाईकांना फोन करून मदतीसाठी विनंती केली. नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमागे लुटमारीचा उद्देश होता की अन्य काही कारण, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
पुण्यात नोकरी, दिवाळीसाठी आल्या होत्या माहेरी
वर्षा तुरकर या मूळच्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही गावच्या रहिवासी होत्या. त्या पुण्यात एअर होस्टेस म्हणून कार्यरत होत्या. 2024 मध्ये त्यांनी समर सैयद यांच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर दोघेही पुण्यात वास्तव्यास होते. त्यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी वर्षा माहेरी आल्या होत्या. मात्र, आनंदाच्या सणानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिक्षणादरम्यान झाली होती रितेशशी ओळख
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण घेत असताना वर्षा यांची गोंदिया येथील रितेश अग्रवाल याच्याशी ओळख झाली होती. दोघांमध्ये मैत्री होती. 14 नोव्हेंबर रोजी रितेश वर्षा यांच्या किन्ही येथील माहेरी आला होता. त्यानंतर सायंकाळी दोघेही फिरण्यासाठी घराबाहेर पडले.
ते महाराष्ट्राच्या हद्दीतील बोंडरानी गावाजवळील वैनगंगा नदीच्या किनार्यावर गेले होते. नदीकाठावरील मंदिर परिसरातून ते जंगलाच्या दिशेने गेल्याची माहिती आहे. याच परिसरात वर्षा यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या ठिकाणी नेमका घटनाक्रम काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
धारदार शस्त्राने पाठीवर वार ; हल्ल्यानंतर नातेवाईकांना फोन
प्राथमिक माहितीनुसार, मास्क घातलेल्या अज्ञात व्यक्तींनी वर्षा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांच्या पाठीवर वार करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. हल्लेखोरांचा उद्देश लुटमारीचा असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे मात्र हल्लेखोरांची संख्या किती होती, त्यांनी वर्षा यांच्याकडील वस्तू लुटल्या का आणि हल्ल्यामागे अन्य काही कारण होते का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मृत्यूशी झुंज देताना जिजूंना केला अखेरचा फोन
या घटनेतील सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे गंभीर जखमी झाल्यानंतरही वर्षा यांनी मदतीसाठी नातेवाईकांना फोन केला. सायंकाळी सुमारे सहा वाजता त्यांनी आपले जिजू पप्पू पटेल यांच्याशी संपर्क साधला. आपल्यासोबत लुटमारीची घटना घडली असून आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
फोन मिळताच पप्पू पटेल यांनी इतर नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे वर्षा रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.
मित्र आणि नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी
ही घटना महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील दौनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोंडरानी गावाजवळ घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून वर्षा यांच्यासोबत फिरायला गेलेला रितेश अग्रवाल आणि त्यांना रुग्णालयात घेऊन जाणारे जिजू पप्पू पटेल यांची चौकशी करण्यात आली आहे. घटनेपूर्वी आणि घटनेनंतर नेमके काय घडले, घटनास्थळी कोण उपस्थित होते, हल्लेखोरांचा प्रवेश आणि पलायनाचा मार्ग कोणता होता, यासह विविध बाबींची तपासणी केली जात आहे. पोलिसांकडून संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून घटनाक्रमाची पडताळणी केली जात आहे.
लुटमार की पूर्वनियोजित हल्ला? तपासातून उलगडणार गूढ
वर्षा यांच्यावर झालेला हल्ला लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आला होता का, की त्यामागे वैयक्तिक कारण किंवा अन्य काही कट होता, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.
