यावल शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘धरती आबा’ वीर बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती उत्साहात
यावल (सोमवार, 16 नोव्हेंबर 2026) : यावल शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतीकारक, जननायक ‘धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती अतिशय उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ.एस.आर.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आदिवासी संस्कृती, राष्ट्रसेवा आणि बिरसा मुंडा यांचे विसरता न येणारे योगदान होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक सी. टी. वसावे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बिरसा मुंडा यांनी अल्पवयातच ब्रिटिश सत्तेविरुद्ध एल्गार पुकारत आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांचे विचार आणि कार्य आजच्या तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणादायी ठरतील.या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाची विशेष उपस्थिती लाभली होती.
यामध्ये प्रामुख्याने डॉ.पी.व्ही.पावरा आणि संतोष ठाकूर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत पार पडलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील सुमारे 30 उत्साही विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.विशेष म्हणजे, या प्रसंगी काही विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आदिवासी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता झाली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जाणिवांची रुजवणूक होण्यास मदत झाली आहे.
