पंढरपुरात काळजाचा थरकाप ! 50 फूट खोल विहिरीत मातीचा डोंगर कोसळला ; चार मजूर गाडले, दोघांचा मृत्यू
पंढरपूर (सोमवार, 16 नोव्हेंबर 2026) : विहिरीच्या खोदकामादरम्यान अचानक मातीचा प्रचंड भराव आणि मोठमोठे दगड कोसळल्याने चार मजूर थेट ढिगार्याखाली गाडले गेल्याची भीषण दुर्घटना पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 50 फूट खोल विहिरीत घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत दोन मजुरांचा मृत्यू झाला असून, अन्य दोघांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
खोदकाम सुरू असतानाच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, आंबे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांच्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने विहीर खोदण्याचे काम सुरू होते. विहिरीचे खोदकाम जवळपास 50 फूट खोलपर्यंत पोहोचले होते. रविवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मजूर विहिरीत काम करत असताना अचानक आजूबाजूची माती आणि मोठमोठे दगड कोसळले. काही क्षणांतच सुमारे 25 फूट उंचीचा मातीचा ढिगारा विहिरीत जमा झाला आणि आत काम करणारे चारही मजूर त्याखाली दबले गेले.
चार मजुरांवर कोसळला संकटाचा डोंगर
या दुर्घटनेत मंगेश मोरे (35), सिद्धेश्वर घाडगे (45), आबासाहेब घोडके (50) आणि तानाजी घोडके (54) हे चार मजूर ढिगार्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाच्या प्रयत्नांनंतर दोन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित दोन मजूर अद्याप ढिगार्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मातीचा भराव कोसळल्याने दुर्घटना?
50 फूट खोल विहिरीत खोदकाम सुरू असताना आजूबाजूच्या मातीचा आधार कमकुवत झाल्याने हा भराव कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जेसीबीसारख्या अवजड यंत्रांच्या वापरामुळे निर्माण होणारी कंपने, मातीचा प्रकार तसेच विहिरीच्या कडांना पुरेसा संरक्षक आधार नसणे यांसारख्या बाबी दुर्घटनेमागे कारणीभूत ठरल्या असण्याची शक्यता आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
पुण्याहून एनडीआरएफचे पथक दाखल
दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुण्याहून एनडीआरएफच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे. विहिरीतील मोठ्या प्रमाणातील माती आणि दगड हटवताना पुन्हा ढिगारा कोसळण्याचा धोका असल्याने अत्यंत सावधगिरीने बचावकार्य केले जात आहे. उर्वरित दोन मजुरांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक प्रशासनाचे पथक सातत्याने प्रयत्नशील आहे.
चार मजूर विहिरीत अडकणे, त्यापैकी दोघांचा मृत्यू आणि उर्वरित दोघांच्या शोधासाठी सुरू असलेले बचावकार्य यामुळे आंबे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
