उपक्रमशील शिक्षकांमुळे संस्थेचा नावलौकिक उंचावतो : माजी आमदार शिरीष चौधरी

खिरोदा ध.ना.विद्यालयाच्या उपशिक्षिका भारती बढे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव


रावेर (रविवार, 8 नोव्हेंबर 2026) : उपक्रमशील आणि समर्पित वृत्तीने कार्य करणार्‍या शिक्षकांमुळे शाळेचा तसेच संस्थेचा नावलौकिक उंचावतो. शिक्षक सेवानिवृत्त झाले तरी त्यांचे ज्ञान आणि अनुभव समाजासाठी मार्गदर्शक ठरतात त्यामुळे भारती बढे यांनी यापुढेही कलाम सायंटिस्ट सेंटरच्या माध्यमातून आपले शैक्षणिक कार्य सुरू ठेवावे, असे प्रतिपादन जनता शिक्षण मंडळाचे संस्थाप्रमुख तथा माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केले.

यांची होती उपस्थिती
खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका भारती बढे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कुमार चौधरी होते.

यावेळी युवा नेते धनंजय चौधरी, संस्थेचे सचिव अजित पाटील, माजी सचिव प्रभात चौधरी, सहसचिव सुधाकर झोपे, संचालिका रोहिणी चौधरी, अशोक कोलते, भास्कर राणे, प्राचार्या लता मोरे, प्राचार्य वाय. व्ही. पाटील, अतुल महाजन, मुख्याध्यापक वाय.एल.पाटील, हर्षा नेमाडे, मुख्याध्यापिका मनिषा महाजन, पर्यवेक्षक एस. आर. किरंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारती बढे यांनी अध्यापनासोबतच विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यालयाचा नावलौकिक राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आय.बी.टी., अटल टिंकरिंग लॅब आणि कलाम सायंटिस्ट सेंटरच्या माध्यमातून त्यांनी शाळेतील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना सुटीच्या दिवशीही मार्गदर्शन केले. त्यांच्या या निस्वार्थी, सेवाभावी आणि उपक्रमशील कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात अध्यक्ष कुमार चौधरी यांच्याहस्ते तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भारती बढे व त्यांचे पती यांचा शाल, हार, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सहसचिव सुधाकर झोपे यांनी ही संस्था पूज्य मधुकरराव चौधरी यांच्या स्वप्नातील शाळा असल्याचे सांगत, भारती बढे यांनी केलेल्या निस्वार्थी सेवेचे कौतुक केले. अध्यक्ष कुमारदादा चौधरी यांनी अशा उपक्रमशील शिक्षकांमुळे संस्थेची मान उंचावते. सेवानिवृत्तीनंतरही शिक्षक समाजाचे मार्गदर्शक म्हणून कार्य करू शकतात, असे मत व्यक्त केले.

यावेळी धनंजय चौधरी यांनीही भारती बढे यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सन्मानपत्राचे वाचन मनिषा पाटील यांनी केले. विद्यार्थिनी मोक्षदा फालक, वैभवी जामोदकर तसेच उपशिक्षिका हेमलता चौधरी यांनी भारती बढे यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना भारती बढे यांनी संस्थेने, शाळेने आणि सहकार्‍यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनता शिक्षण मंडळासारख्या संस्थेत सेवा करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी तर सूत्रसंचालन मनिषा पाटील व प्रा.जगदीश ढोले यांनी केले. आभार एस.पी.बाक्षे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !