अजितदादांशिवाय बारामतीचा पाडवा वेदनादायी ; अर्थखाते राष्ट्रवादीकडेच राहावे ! सुनील तटकरे


पुणे (मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय बारामतीत साजरा होणारा यंदाचा पाडवा मनाला चटका लावणारा आहे. गेल्या 30 वर्षांपासून पाडव्याला बारामतीत येण्याची परंपरा यंदाही कायम राहिली; मात्र अजितदादा नसल्याची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. याचवेळी राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिले पाहिजे, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली.

अर्थखाते राष्ट्रवादीकडेच राहावे, तटकरे आग्रही
सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवार यांनी महाराष्ट्राला विक्रमी अर्थसंकल्प दिले असून सलग 11 अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्यामुळे अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. शरद पवार यांचे निवासस्थान जसे देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले, तसेच अजित पवार यांचे निवासस्थानही राजकीय घडामोडींचे केंद्र राहिले आहे.








विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना तटकरे यांनी सावध भूमिका घेतली. विलीनीकरणाबाबत काही निर्णय घ्यायचा झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या योग्य वेळी निर्णय घेतील. यासंदर्भात मला सध्या कोणतीही माहिती नाही. दिवाळीनिमित्त मी माझ्या गावी होतो. योग्य वेळी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करूनच या विषयावर बोलता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पवार-पटेल भेटीचा वेगळा अर्थ काढू नका
खासदार प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, या दोघांची भेट होतच असते. त्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढण्यात काहीच फायदा नाही. आम्ही आज जे काही आहोत, ते अजित पवार आणि शरद पवार यांच्यामुळेच आहोत. माझ्यावर झालेल्या आरोपांना अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उत्तर द्यायचे नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

अजितदादांच्या आठवणींनी बारामतीकर भावूक
बारामतीतील पाडव्याच्या कार्यक्रमाबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, अजित पवार आपल्यात नसताना यंदा बारामतीत येण्याची वेळ आली, याचे प्रचंड दुःख आहे. गेल्या 30 वर्षांपासून आम्ही पाडव्याला बारामतीत येत आहोत; मात्र यंदा येथे उसळलेला जनसागर यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता. अजितदादांशिवाय बारामतीचा पाडवा साजरा होत आहे, ही बाब मनाला पटणारी नाही. नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. त्यांच्या स्मृतींसमोर नतमस्तक होण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत, असे तटकरे यांनी सांगितले.

बारामतीला आम्ही पंढरी मानतो. या पवित्र स्थळाचे महत्त्व कमी होईल, असे कोणतेही वक्तव्य मला करायचे नाही, असेही त्यांनी नमूद केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !