सातपुडा पर्वताचे रक्षण करणे हीच खरी गोवर्धन पूजा ! : सदगुरू शास्त्री भक्तिप्रकाशदासजी
सावदा स्वामीनारायण गुरुकुलात अन्नकूट महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा ; निसर्गसंवर्धनाचा दिला मोलाचा संदेश
सावदा (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : धार्मिक परंपरा, भक्तीभाव आणि निसर्ग संवर्धनाचा अनमोल संदेश देणारा अन्नकूट महोत्सव सावदा येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्थेत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात विविध खाद्यपदार्थांची आकर्षक व मनमोहक अन्नकूट सजावट करण्यात आली होती. भगवान श्रीहरींच्या चरणी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा भव्य नैवेद्य अर्पण करण्यात आला. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.
यांची होती उपस्थिती
या महोत्सवानिमित्त व्यासपीठावर सद्गुरू शास्त्री भक्तिप्रकाशदासजी, कोठारी स्वयंप्रकाशदासजी, भंडारी माधवदासजी, दत्तात्रेय गुरव महाराज, धनराज महाराज, धनंजय चौधरी तसेच वैद्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोवर्धन पूजेचा खरा अर्थ सांगितला
यावेळी सद्गुरू शास्त्री भक्तिप्रकाशदासजी यांनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करताना गोवर्धन पूजेचा खरा अर्थ उलगडून सांगितला. देवपूजेइतकीच निसर्गपूजाही महत्त्वाची आहे. निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करणे हीच ईश्वराची खरी सेवा आहे, असे सांगत त्यांनी धार्मिक श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड दिली.
सातपुडा हाच आपला गोवर्धन
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सातपुडा पर्वतरांगांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, आपल्या परिसरातील सातपुडा हाच आपला गोवर्धन आहे. मात्र, आपणच वृक्षतोड करून, नद्या व जलस्रोतांचे योग्य संवर्धन न करता निसर्गाचे नुकसान करीत आहोत. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे; परंतु त्याचे जतन करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. सातपुड्याचे रक्षण करणे, वृक्षांचे संवर्धन करणे आणि जलसंपत्तीचे जतन करणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून तीच खरी गोवर्धन पूजा असल्याचा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला. गोवर्धन पूजा ही केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्याच्या रक्षणाचा संकल्प करण्याची प्रेरणा आहे, हा विचार त्यांच्या मार्गदर्शनातून प्रभावीपणे मांडण्यात आला.
गुरुकुल परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला
संत-महंतांचे आध्यात्मिक मार्गदर्शन, आकर्षक अन्नकूट सजावट आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण गुरुकुल परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सातपुड्याच्या संरक्षणासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारा हा महोत्सव भाविकांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला.