भुसावळ रेल्वे विभागात कर्मचार्‍यांसाठी आरोग्यविषयक विशेष कार्यशाळा : निरोगी आणि तणावमुक्त जीवनशैलीचा दिला संदेश


भुसावळ (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : रेल्वे कर्मचार्‍यांना दैनंदिन कामकाजादरम्यान विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. अहोरात्र वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कर्तव्य बजावताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये, तसेच त्यांना निरोगी जीवनशैलीची सवय लागावी, या उद्देशाने भुसावळ रेल्वे विभागात विशेष आरोग्यविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

आनंदी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन
13 नोव्हेंबर रोजी भुसावळ येथील कृष्णचंद्र सभागृहात कर्मचारी लाभ निधीअंतर्गत ही कार्यशाळा पार पडली. यावेळी मार्गदर्शक अरुण ऋषी यांनी उपस्थित रेल्वे कर्मचार्‍यांना आरोग्य संवर्धन आणि आनंदी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, चुकीच्या सवयींचे दुष्परिणाम कसे टाळावेत आणि सोप्या तंत्रांचा अवलंब करून तणावमुक्त जीवन कसे जगावे, याबाबत त्यांनी विविध उपयुक्त टिप्स दिल्या. अध्यक्षस्थानी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रविण कुमार पाठक होते. त्यांनीही अशा उपक्रमांचे महत्त्व विशद करताना कर्मचार्‍यांच्या आरोग्य संवर्धनासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी दिलीप आर. खरात यांनी कार्मिक विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले.

कर्मचारी कल्याणाला प्राधान्य
रेल्वे कर्मचार्‍यांचे आरोग्य, कल्याण आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी भुसावळ विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यशाळेमुळे कर्मचार्‍यांना निरोगी जीवनशैलीचा दृष्टिकोन मिळण्यास मदत झाली असून, अशा उपक्रमांना विभागाकडून भविष्यातही प्रोत्साहन दिले जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !