जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सुमित पाटील यांना मोठा दिलासा ; विभागीय सहनिबंधकांकडून उमेदवारी अर्ज वैध घोषित
निवडणूक निर्णय अधिकार्यांचा आदेश रद्दबातल ; पाचोरा सोसायटी मतदारसंघातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष
जळगाव (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी बँक) 2026 ते 2031 या कालावधीसाठी होणार्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोर पाटील यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. नाशिक विभागाचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) संभाजी निकम यांनी सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्याचा महत्त्वपूर्ण आदेश पारित केला आहे. यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अर्ज नामंजूर करण्याबाबत दिलेला यापूर्वीचा निर्णय रद्दबातल ठरला असून, सुमित पाटील यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक विभागीय सहनिबंधक प्राधिकरणाकडे अपिल
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सुमित पाटील यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि. का. स. सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था यांचे प्रतिनिधी मतदारसंघ तालुका- पाचोरा या मतदारसंघातून चार नामनिर्देशनपत्र (क्रमांक 331, 332, 333 व 334) दाखल केले होते. मात्र, छाननी प्रक्रियेदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार सतीश परशुराम शिंदे यांनी संस्थेच्या ठरावातील तांत्रिक मुद्द्यावर आक्षेप घेत हरकत नोंदवली होती. या हरकतीवर सुनावणी घेत निवडणूक निर्णय अधिकार्यांनी 2 नोव्हेंबर रोजी सुमित पाटील यांचे चारही उमेदवारी अर्ज अवैध (नामंजूर) ठरवले होते.
निवडणूक निर्णय अधिकार्यांचा 2 नोव्हेंबरचा आदेश रद्द
निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या या निर्णयाविरोधात सुमित पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधक प्राधिकरणाकडे अपील दाखल करून दाद मागितली होती. या अपिलावर सुनावणी झाल्यानंतर विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी 12 नोव्हेंबर रोजी आपला अंतिम निकाल जाहीर केला. सुमित पाटील यांनी पाचोरा तालुका मतदारसंघातून दाखल केलेले नामनिर्देशनपत्र कायदेशीरदृष्ट्या वैध ठरत असल्याच्या निष्कर्षाप्रत येत प्राधिकरणाने त्यांचे अपील मंजूर केले.निवडणूक निर्णय अधिकार्यांचा 2 नोव्हेंबरचा आदेश रद्द करून सुमित किबशोर पाटील यांचे नाव वैध नामनिर्देशनपत्रांच्या यादीत समाविष्ट करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. आता 17 नाव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेत महायुती टीकवण्यासाठी मोठी कसरत
जिल्ह्यात पाचोरा-भडगाव, मुक्ताईनगर-बोदवड, पारोळा-एरंडोल, चोपडा व धरणगाव या पाच ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. यातील पाचोरा-भडगाव व मुक्ताईनगर-बोदवड, पारोळा-एरंडोल या तीन मतदार संघात जिल्हा बँकेचे एकूण सहा संचालक निवडून द्यायचे आहेत. दोन जागा बिनविरोध झाल्या असून आता पाचोर्याचे आमदार किशोर पाटील, मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या विरोधातच आक्रमक भुमिका घेतल्याने बैठकांमधून तोडगा निघु शकलेला नाही. या दोन्ही आमदारांमुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मोठी गोची होणार आहे. जिल्हा बँकेत महायुती टीकवण्यासाठी मोठी कसरत येणार्या तीन दिवसात करावी लागणार आहे.
