आई स्वयंपाकघरात, बाळ पाळण्यात… अचानक घरात शिरला वाघ ; सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू !
भंडारा (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : घरातील पाळण्यात निवांत झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या बाळावर वाघाने अचानक हल्ला केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना भंडारा जिल्ह्यातील तिर्री येथे घडली. आई स्वयंपाकघरात असतानाच घरात शिरलेल्या वाघाने पाळण्यातून बाळाला उचलून नेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अद्विक अभिमन बोंदरे असे मृत बालकाचे नाव आहे. शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आईच्या डोळ्यांदेखत काळाचा घाला
तिर्री येथील अभिमन बोंदरे यांच्या कुटुंबात दोन मुली असून अद्विक हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. शुक्रवारी सायंकाळी घरात आई स्वयंपाक करीत होती, तर सहा महिन्यांचा अद्विक पाळण्यात झोपला होता. याचवेळी अचानक वाघाने घरात प्रवेश केला आणि पाळण्यात झोपलेल्या बाळाला उचलले.
हा प्रकार लक्षात येताच आईने आरडाओरड केली. आवाज ऐकताच वाघ घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अद्विकचा काही वेळातच मृत्यू झाला. एका क्षणात आनंदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबाचा आक्रोश
घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. बोंदरे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा हिरावला गेल्याने कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
आठवडाभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दुसर्या बालकाचा मृत्यू
अड्याळ वन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्यांचा वावर वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. यापूर्वी 5 नोव्हेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या आठवडाभरात तिर्री येथे वाघाच्या हल्ल्यात सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाकडून कार्यवाही; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, या घटनेनंतर जंगलालगतच्या गावांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
वनविभागाने परिसरात नियमित गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच मृत बालकाच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
