भुसावळ उपविभागात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ : तलवार जप्त : पाच हद्दपार आरोपींवर कारवाई

अवैध धंद्यांवर पोलिसांचा कडक प्रहार : 13 वॉरंट बजावले, वाहतूक नियमभंग करणार्‍यांकडून 83 हजार 500 रुपयांचा दंड वसूल


भुसावळ (सोमवार, 16 नोव्हेंबर 2026) : भुसावळ उपविभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबविली. सोमवार, 16 नोव्हेंबर रोजी बाजारपेठ, शहर, नशिराबाद व तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकत्रित कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अवैध दारू विक्री, जुगार, शस्त्र अधिनियम, प्रतिबंधात्मक कारवाई, वाहतूक नियमभंग तसेच सराईत गुन्हेगारांच्या तपासणीवर विशेष भर देण्यात आला.

अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई
दारूबंदी कायद्यांतर्गत गावठी हातभट्टी दारूचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत 158 लिटर गावठी दारू आणि 80 लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. तसेच देशी व विदेशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एकूण आठ आरोपींवर कारवाई करून 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुगार अड्ड्यांवर छापे
जुगार कायद्यांतर्गत सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून आठ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून पाच हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शस्त्र अधिनियमासह प्रतिबंधात्मक कारवाई
शस्त्र अधिनियमांतर्गत एक गुन्हा दाखल करून एका आरोपीवर कारवाई करीत 500 रुपये किंमतीची तलवार जप्त करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अंतर्गत पाच गुन्हे दाखल करून पाच हद्दपार आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 अंतर्गत तीन प्रतिबंधात्मक गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित कारवाईत पोलिसांनी एकूण 13 अजामीनपात्र व जामीनपात्र वॉरंट बजावले तसेच 10 समन्सची बजावणी करण्यात आली.

वाहतूक नियमभंग करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई
मोटार वाहन कायदा व वाहतूक शाखेच्या कारवाईत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या तीन प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. विनाहेल्मेट वाहन चालविणार्‍या 11 जणांवर, अनधिकृत पार्किंगच्या 13 प्रकरणांवर, तर मोटार वाहन कायद्यांतर्गत अन्य 59 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण 83 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सराईत गुन्हेगारांची तपासणी ; पाच मोबाईल हस्तगत
प्रतिबंधात्मक व इतर तपासणी मोहिमेत 73 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. अभिलेखावरील 37 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. शांतता भंग करणार्‍या 15 मद्यपी व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. याशिवाय 22 हॉटेल व लॉज आणि 19 भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. कोटपा कायद्यांतर्गत पानटपर्‍यांवर 23 प्रकरणे दाखल करून तीन हजार 60 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून पाच मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे 60 हजार रुपये आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आगामी काळातही कारवाई
भुसावळ उपविभागात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यास आणि वाहतूक शिस्त राखण्यास मदत झाली आहे. असामाजिक तत्त्वे व नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे भुसावळ उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !