बोरनार येथे लग्न सोहळ्यातील वादातून तरुणाचा खून


जळगाव (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसोहळ्यादरम्यान झालेल्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. प्रेम गोपाल धनगर (23, मूळ रा. बोरनार, सध्या रा. अमळनेर) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवार, 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी काही संशयीतांनी चौकशीकामी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

वादानंतर झाला खून
मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रेम धनगर हा अमळनेर येथे वास्तव्यास होता, तर त्याचे आई-वडील बोरनार येथे राहतात. दोन दिवसांपूर्वीच प्रेम हा आपल्या गावी बोरनार येथे आला. बुधवारी सायंकाळी तो गावातील एका लग्नसोहळ्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी कुणाशीतरी जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन अज्ञात हल्लेखोराने प्रेम याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रेम याचा जागीच मृत्यू झाला. खुनाची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत प्रेम याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे नेमके कोण आहे आणि वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला ? याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हीती.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !