दीपनगरातील उपकार्यकारी अभियंत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा : समोर आले धक्कादायक कारण
भुसावळ (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : नोकरी मिळवून देण्याच्या प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात उघडकीस आला आहे. दिव्यांग वैद्यकीय फेरतपासणीसंदर्भात बनावट आदेश व प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी दीपनगरातील उपकार्यकारी अभियंता माधव गोविंदराव केंद्रे विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण ?
मानव संसाधन, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित विभागाचे व्यवस्थापक सुरेश आनंदा घटे (55 विद्युत नगर, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील दीपनगर येथील कार्यालयाच्या दिशाभूल करण्याच्या उद्देशाने आरोपीने दिव्यांग वैद्यकीय फेरतपासणीसंदर्भात बनावट कागदपत्रांचा वापर केला.
घटे यांना दिव्यांग वैद्यकीय फेरतपासणीसाठी आदेश दिल्यानंतर
संशयीताने 3 जुलै 2025 ते 23 जुलै 2025 दरम्यान स्वतःची दिव्यांग वैद्यकीय फेरतपासणी झाल्याबाबत बनावटरीत्या पत्र तयार केले व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर या पत्त्यावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांगजन संस्थान, मुंबई यांच्याकडील बनावट प्रमाणपत्र व संचालकांची बनावट सही असलेले कागदपत्रे तयार करून संबंधित कार्यालयात सादर केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे संबंधित कार्यालयाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. संशयीताला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
