मणिपूरमध्ये विषारी दारूचा कहर : 15 जणांचा मृत्यू, 600 हून अधिक रुग्णालयात दाखल

मिथेनॉल मिसळलेली दारू प्यायल्याचा संशय : 10 जणांना अटक, सहा राज्यांत वर्षभरात 120 हून अधिक बळी


इंफाळ (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : मणिपूरमध्ये विषारी दारू प्राशन केल्याने मोठी दुर्घटना घडली असून, चंदेल जिल्ह्यात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विषारी दारू प्यायल्याने 600 हून अधिक नागरिकांची प्रकृती बिघडली असून, त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांत ही घटना उघडकीस आली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू प्राशन केल्यानंतर अनेकांना अचानक त्रास सुरू झाला. मात्र, संबंधित दारू नेमकी कुठून आणण्यात आली होती, याबाबत सुरुवातीला स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.

दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, बाधित नागरिकांनी प्राशन केलेली दारू मणिपूरमधील काकचिंग जिल्ह्यातील सुगनू येथून खरेदी करण्यात आली होती. या दारूमध्ये विषारी मिथेनॉल मिसळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना अटक केली असून, दारूचा पुरवठा करणार्‍या साखळीचा शोध सुरू केला आहे.

चंदेल जिल्ह्यात स्थानिक पातळीवर दारू तयार करण्यात आल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे अन्य भागांतून दारू आणून तिची विक्री करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयात जाऊन पाहणी
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री युम्नाम खेमचंद सिंह यांनी रुग्णालयात जाऊन बाधित रुग्णांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, शिजा रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतन हुंडोंगबाम यांनी रुग्णालयातील सर्व खाटा भरल्याची माहिती दिली आहे.

सहा राज्यांत विषारी दारूमुळे 120 हून अधिक मृत्यू
विशेष म्हणजे, 2026 या वर्षात मध्य प्रदेश, गुजरातसह देशातील सहा राज्यांमध्ये विषारी दारू प्राशन केल्यामुळे 120 हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. मणिपूरमधील ताज्या घटनेने अवैध दारू विक्री आणि विषारी मद्याच्या पुरवठ्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !