178 वर्षांची रथोत्सव परंपरा : त्रिपुरारी पौर्णिमेला फैजपूरमध्ये भक्तिसागर
हरिनामाच्या गजराने शहर दुमदुमले ; स्वयंभू पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी : महिलांनाही रथ ओढण्याचा मान
फैजपूर (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर आणि ‘स्वयंभू पांडुरंग महाराज की जय’च्या जयघोषाने फैजपूर नगरी मंगळवार, 24 भक्तिरसात न्हाऊन निघाली. त्रिपुरारी पौर्णिमेच्या मंगल पर्वावर संत खुशाल महाराज देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ऐतीहासिक पांडुरंग रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. तब्बल 178 वर्षांची परंपरा लाभलेल्या या रथोत्सवासाठी फैजपूरसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली.
नगराध्यक्षांच्या हस्ते पूजन
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता रथोत्सवाला प्रारंभ झाला. त्यापूर्वी रथगल्ली येथील संत खुशाल महाराज देवस्थानात स्वयंभू पांडुरंगाची विधीवत महापूजा करण्यात आली. नगराध्यक्षा दामिनी सराफ आणि नगरसेवक पवन सराफ या दाम्पत्याच्या हस्ते पांडुरंगाची तसेच आकर्षक फुलांनी सजविण्यात आलेल्या रथाची पूजा करण्यात आली. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती रथावर विराजमान करण्यात आली. त्यानंतर जयघोष, भजन आणि टाळ-मृदंगाच्या गजरात रथाची मिरवणूक मार्गस्थ झाली.
महिलांनाही रथ ओढण्याचा मान
रथावर विराजमान झालेल्या स्वयंभू पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. अनेकांनी ‘याची देही, याची डोळा’ पांडुरंगाचे दर्शन घेत धन्यता मानली. विशेष म्हणजे, यंदाच्या रथोत्सवात महिलांनाही रथ ओढण्याचा मान देण्यात आला त्यामुळे महिला भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
इस्कॉन भजनी मंडळाने केले वातावरण प्रसन्न
रथोत्सवाच्या मिरवणुकीत परिसरातील विविध भजनी मंडळांसह इस्कॉन भजनी मंडळाने भक्तिगीतांच्या माध्यमातून वातावरण भक्तिमय केले. देवीचे स्वरूप असलेल्या आकर्षक वाहनानेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच शिवकालीन मर्दानी आखाडा व्यायामशाळेच्या तरुण-तरुणींनी सादर केलेल्या चित्तथरारक मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.
या भागातून रथोत्सवाची मिरवणूक
रथोत्सवाची मिरवणूक रथगल्ली येथून लक्कड पेठ, सुभाष चौक, खुशाल भाऊ रोड आणि ब्राह्मण गल्ली या मार्गाने मार्गक्रमण करीत पुन्हा रथगल्ली येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर भाविकांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी भक्तिमय वातावरण आणि उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले.
या मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला मंदिराचे प्रमुख प्रवीणदास महाराज, मिथिलेश महाराज, दिगंबर महाराज, पंढरपूर मठाचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, भाजपचे गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, उपगटनेते सूरज गाजरे, नगरसेवक राहुल गुजराथी, भाजप शहराध्यक्ष पप्पू जाधव, नितीन राणे, माजी नगराध्यक्ष पी.के.चौधरी, निलेश राणे, माजी नगरसेवक केतन किरंगे, किरण चौधरी, डॉ.उमेश चौधरी, डॉ.सुनील चौधरी, डॉ.श्रीकांत कुलकर्णी, डॉ.नितीन महाजन तसेच फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एल.चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीत चोख बंदोबस्त
धार्मिक विधींचे पौरोहित्य दिनेश जोशी महाराज आणि त्यांच्या सहकार्यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नीरज बोकील, विनोद गाभणे आणि त्यांच्या सहकार्यांनी संपूर्ण मिरवणूक मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. रथगल्ली मित्रमंडळाने रथोत्सवाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
सुभाष चौकातील भव्य रांगोळीने वेधले लक्ष !
पांडुरंगाच्या स्वागतासाठी फैजपूरच्या सुभाष चौकात भव्य आणि आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती. या रांगोळीसाठी तब्बल 100 ते 125 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. कलाशिक्षक राजू साळी आणि त्यांच्या सहकार्यांसह विकी जयस्वाल, तुषार कुमावत, ललित कोष्टी, राधिका काटोके, मानव काटोके, दादू मेढे, सागर मेढे, महबूब शेख आणि कासीम शेख यांनी रांगोळी साकारण्यासाठी मेहनत घेतली. या ठिकाणी सायंकाळी महाआरती करण्यात आली. रथोत्सवाच्या मार्गावर गोपाळ तेली यांनी भाविकांना प्रसादाचे वाटप केले.
