भुसावळातील रहिवासी वस्तीत श्री विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट : एकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा


भुसावळ (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करून निवासी परिसरात श्री विसर्जन मिरवुणकीत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणार्‍या एकाविरोधात भुसावळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने डीजे चालकांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरातील खळवाडी परिसरातील सार्वजनिक जागी निर्धारित ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवण्यात येत असल्याचे शहर पोलिसांनी नॉईस मीटरद्वारे केलेल्या तपासणीत स्पष्ट होताच पोलिसांनी कारवाई केली.

श्री विसर्जन मिरवणुकीत नियम धाब्यावर
भुसावळ शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री विसर्जन मिरवसणुकीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत 25 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.48 ते रात्री 7.30 वाजेदरम्यान भुसावळ शहरातील खळवाडी परिसरात हा प्रकार घडला. संशयित जसपाल भंगाळे याने त्याच्या ताब्यातील डीजे वाहन (एम.एच.04 -5156) वर लावलेले स्टिरिओ बॉक्स मोठ्या आवाजात वाजविले. डीजेचा आवाज निवासी क्षेत्रासाठी तसेच ध्वनिक्षेपणासाठी निर्धारित केलेल्या कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निष्पन्न झाले. या कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिकांसह बंदोबस्तावरील पोलीस कर्मचार्‍यांनाही त्रास सहन करावा लागत होता. ध्वनिप्रदूषणासाठी निश्चित केलेल्या कायदेशीर मर्यादांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी कारवाई केली.

एकाविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल यश सतीश डोलारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात जसपाल भंगाळेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 तसेच ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 मधील नियम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गजानन भाऊसिंग पाटील तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !