पुण्यात न्यायालयाच्या गेटवर रक्तरंजित थरार ! गोळीबारानंतर कोयत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटले ; हल्ल्यात एकाचा मृत्यू
शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर 6 ते 7 हल्लेखोरांचा हल्ला; घटनास्थळी दोन पिस्तुले आणि जिवंत काडतुसांनी भरलेली मॅगझिन जप्त
पुणे (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर बुधवारी भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळीबार केला. जीव वाचवण्यासाठी पळणार्या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुणाचे दोन्ही हात छाटले गेल्याची माहिती समोर आली असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
न्यायालय परिसरात मोठी वर्दळ असताना घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, 6 ते 7 हल्लेखोर दोन दुचाकींवरून घटनास्थळी आले होते. त्यांनी तरुणावर गोळीबार केल्यानंतर त्याचा पाठलाग करत कोयत्याने हल्ला केला. घटनेनंतर आरोपी तोफखाना चौकाच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला. घटनास्थळावरून दोन पिस्तुले आणि जिवंत काडतुसांनी भरलेली मॅगझिन जप्त करण्यात आली आहे. फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा करण्यात येत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची पार्श्वभूमी असताना न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच हा हल्ला झाल्याने न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
