सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण : सोने 3,635 तर चांदी 9,103 रुपयांनी स्वस्त !

24 कॅरेट सोन्याचा भाव 1.21 लाखांवर ; चांदीचा दर 1.43 लाख रुपये किलोवर, ग्राहकांना खरेदीची संधी


नवी दिल्ली (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार अनुभवणार्‍या सोने आणि चांदीच्या बाजारात आज मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (खइग-) च्या आकडेवारीनुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 3,635 रुपयांची घट झाली असून सोने 1 लाख 21 हजार रुपयांवर आले आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही प्रति किलो 9,103 रुपयांची घसरण झाली असून चांदीचा भाव 1 लाख 43 हजार रुपयांवर पोहोचला आहे. या घसरणीमुळे सोने-चांदी खरेदीचा विचार करणार्‍या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

सलग घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण
मिळालेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 1 लाख 44 हजार रुपयांच्या आसपास होता. त्यानंतर सातत्याने झालेल्या घसरणीमुळे सोन्याचा दर 1 लाख 24 हजार रुपयांपर्यंत खाली आला होता. 23 नोव्हेंबर रोजी सलग 16 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या बाजारातही अशीच घसरण दिसून येत आहे.

वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे दर वेगळे का?
देशातील विविध शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात फरक दिसण्यामागे अनेक कारणे आहेत.
वाहतूक आणि सुरक्षा खर्च : एका शहरातून दुसर्‍या शहरात सोने वाहून नेण्यासाठी येणारा खर्च दरावर परिणाम करतो.

स्थानिक मागणी आणि पुरवठा : प्रत्येक शहरातील खरेदी-विक्रीचे प्रमाण वेगवेगळे असल्याने दरात फरक पडतो.

ज्वेलरी असोसिएशनचे दर : स्थानिक बाजारपेठेतील परिस्थितीनुसार ज्वेलर्सकडून दर निश्चित केले जातात.

जुन्या साठ्याची खरेदी किंमत : ज्वेलर्सनी पूर्वी खरेदी केलेल्या सोन्याच्या दराचाही विक्रीच्या किमतीवर परिणाम होतो.

सोने-चांदी खरेदी करताना घाई करू नका !
कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया यांच्या मते, सध्याच्या बाजारातील चढ-उतार लक्षात घेता सोने आणि चांदीची खरेदी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने करणे योग्य ठरू शकते. सुरुवातीला काही प्रमाणात खरेदी करून उर्वरित गुंतवणूक 15 ते 20 दिवसांच्या अंतराने करावी. गुंतवणुकीसाठी एक-दोन महिन्यांऐवजी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी विचारात घ्यावा.

दागिने खरेदी करताना या दोन गोष्टी लक्षात ठेवा

1. बीआयएस हॉलमार्क तपासा : सोने खरेदी करताना ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (इखड) चे हॉलमार्क असलेले प्रमाणित सोनेच खरेदी करावे. हॉलमार्कमुळे सोन्याची शुद्धता आणि कॅरेटची माहिती मिळते.

2. सोन्याचा भाव पडताळून पाहा : खरेदीच्या दिवशीचा बाजारभाव, सोन्याचे अचूक वजन आणि कॅरेट तपासून घ्यावे. 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर वेगवेगळे असतात. त्यामुळे खरेदीपूर्वी अधिकृत स्रोतांकडून दरांची खात्री करावी.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !