दोन हजारांची लाच भोवली : जामन्यापाडा आदिवासी शाळेचा लाचखोर मुख्याध्यापक धुळे एसीबीच्या जाळ्यात

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; आपल्याच विभागाच्या कर्मचार्‍याकडून स्वीकारली लाच


गणेश वाघ
धुळे (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : थकीत वेतनाची रक्कम मिळवून दिल्यानंतर उर्वरित रकमेच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा शासकीय प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुनील रामभाऊ खेडकर (57) यांना धुळे एसीबीने अटक केली. या कारवाईने शिक्षण क्षेत्रातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

आपल्याच विभागाच्या कर्मचार्‍याकडून मागितली लाच
32 वर्षीय तक्रारदार हे जामन्यापाडा येथील आदिवासी शासकीय प्राथमिक आश्रमशाळेत एप्रिल 2026 पर्यंत रोजंदारी तत्त्वावर चौकीदार म्हणून कार्यरत होते. त्यांचे काही महिन्यांचे वेतन थकीत होते. या थकीत वेतनाची रक्कम अदा करण्यासाठी मुख्याध्यापक सुनील खेडकर यांनी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी आठ हजार रुपये तक्रारदाराकडून फोन पे च्या माध्यमातून स्वीकारले.

17 नोव्हेंबर 2026 रोजी तक्रारदाराच्या बँक खात्यात 22 हजार 825 रुपये थकीत वेतन जमा झाल्यानंतर मुख्याध्यापक खेडकर यांनी तक्रारदाराला वारंवार फोन करून वेतनाच्या मोबदल्यात उर्वरित दोन हजार रुपये लाचेची मागणी केली.

पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न
तक्रारदाराने याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. बुधवार, 25 नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपीने पंचांसमक्ष दोन हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. बुधवार, 25 नोव्हेंबर रोजी सापळा कारवाईदरम्यान आरोपीने दोन हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, एएसआय राजन कदम, हवालदार मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला आदींनी सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !