अट्रावलला बालविवाह रोखला : अधिकारी व कर्मचार्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक
यावल पोलीस ठाण्यात आणून संबंधिताना दिली यंत्रणेकडून समज
यावल (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील अट्रावल येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला प्राप्त होताच संबंधित यंत्रणा तातडीने अॅक्शन मोडवर आल्या. लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन आणि यावल पोलिसांनी संयुक्तपणे घटनास्थळी धाव घेत नियोजित बालविवाह रोखण्यात यश मिळवले. प्रशासनाच्या या धडाकेबाज आणि संवेदनशील कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे बालपण, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
गोपनीय माहिती मिळताच कारवाई
अट्रावल, ता.यावल येथे एका अल्पवयीन मुलीच्या विवाहाची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती संरक्षण अधिकारी, यावल यांना मिळाली होती. विवाहाची संपूर्ण तयारी करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संरक्षण अधिकारी यांनी कोणताही विलंब न करता चाईल्ड हेल्पलाईन टीम, जळगाव तसेच यावल पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांशी संपर्क साधला.त्यानंतर संबंधित विभागांच्या अधिकारी व कर्मचार्यांचे संयुक्त पथक तयार करून तातडीने घटनास्थळी धाव घेण्यात आली. घटनास्थळी आवश्यक चौकशी करून संबंधितांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यात आली. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून नियोजित बालविवाह वेळीच थांबविण्यात आला.
विविध विभागांचा समन्वय ; संयुक्त कारवाईला यश
या संपूर्ण कारवाईत प्रशासनातील विविध विभागांनी अत्यंत जबाबदारीने आणि तत्परतेने सहभाग नोंदविला. गोपनीय माहितीची गांभीर्याने दखल घेऊन अल्पावधीत केलेल्या या कार्यवाहीमुळे बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येविरोधात प्रशासनाची ठाम भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही कारवाई जी.एम.भा.अधिकारी ऋषिकेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मीनाक्षी कोळी, चाईल्ड हेल्पलाईन जिल्हा समन्वयक कुणाल शुक्ल, संरक्षण अधिकारी प्रतीक पाटील, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, अट्रावल पोलीस पाटील पवन चौधरी, महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे ब्लॉक समन्वयक भाग्येश टिकराम भंगाळे या सर्वांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे बालविवाह रोखण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पार पडली.
