पिंप्री तापी नदीपात्रात गौण खनिज उत्खननासह चोरी : चार डंपर, एक जेसीबीआणि एक पोकलेन जप्त
यावल तहसीलदारांसह यावल, अंजाळे व साकळी महसूल मंडळाच्या कारवाईने गौण खनिज माफियांमध्ये खळबळ
यावल (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील पिंप्री गावालगत असलेल्या तापी नदी पात्रात बुधवारी दुपारी यावल तहसीलदारांसह यावल, अंजाळे व साकळी महसूल मंडळातील अधिकारी-कर्मचार्यांनी कारवाई करीत नदीपात्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणारे वाहन पकडले. यात चार डंपरसह जेसीबी एक पोकलेनचा समावेश आहे. संबंधीत वाहन पंचनामा करून तहसील कार्यालयात आणण्यात आले. वाहन मालकांना दंडाची नोटीस बजावण्यात येणार आहे. या कारवाईने अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पिंप्री गावालगत तापी नदीचे पात्र असून नदीपात्रात बुधवारी दुपारी अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करून डंपरव्दारे वाहतूक केली जात असल्याची गोपनिय माहिती यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या सोबत निवासी नायब तहसीलदार बी.एम.पवार, अंजाळे मंडळाधिकारी रशीद तडवी, भालोद मंडळ अधिकारी अनिल सुरवाडे, साकळी मंडळाधिकारी रिद्धी निगोट, ग्राममहसुल अधिकारी राजू पारधी, अतुल घाडगे, पवन नवगाडे, वसीम तडवी, मिलिंद कुरकुरे, संदीप गोसावी, सुनील कुंभार, सौरभ कोळी, गजानन पाटील, भूषण सूर्यवंशी, विजयसिंह पाटील, अमित राऊत, महेंद्र खुर्दा, ईश्वर कोळी, संजय दंडगोळे, ताराचंद तावडेसह महसुल सेवकांच्या पथकासह पिंप्री गाठले.
एकाचवेळी कारवाईने खळबळ
पथकाला नदीपात्रात त्यांना चार मोठे डंपर, एक पोकलँड, एक जेसीबी तापी नदीकाठी गौण खनिज उत्खनन व वाहतूक करत असतांना आढळले. घटनास्थळी पंचनामा करून सर्व वाहने ही यावल तहसील कार्यालयात लावण्यात आली. सर्व वाहन मालकांना आता दंडाची नोटीस देण्याची कार्यवाही सुरू आहे. एकाच दिवशी एकाच ठिकाणी महसुल विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे आता यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे
या वाहन मालकांवर होणार कारवाई
जेसीबी (क्रमांक एम.एच. 19 ई. बी. 7748) मालक योगेश संजय काळे, विना क्रमांकाचे पोकलेन मालक आशिष भिरुड (रा.जळगाव), डंपर (क्रमांक एम.एच. 19 सी.एक्स. 9122), डंपर (क्रमांक एम.एच. 19 सी. एक्स 8122) मालक मनोज पाटील जळगाव, डंपर (क्रमांक एम.एच. 19 सी. डब्ल्यू 9500) मालक शंकर बिर्हाळे (जळगाव), एक विना क्रमांकाचे डंपर जप्त करण्यात आले.
