कजगावातील तरुणावर जुन्या वादातून गोळीबार : दोन्ही आरोपींना अटक
भडगाव (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : जुन्या वादाचा राग मनात धरून कजगावातील तरुणावर गोळीबार करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना अलीकडेच घडली होती. या प्रकरणी भडगाव पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला अटक केली. पियुष ऊर्फ विकी दिलीप पाटील (22, रा.कजगाव, ता.भडगाव) व मुख्य आरोपी मुन्ना उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत (रा.कजगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
काय घडले कजगावात ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर 2026 रोजी जयेश ज्ञानेश्वर पवार (23, रा.कजगाव) हे सोलर प्लँटवर कामावर निघाल्यानंतर तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून संशयीत मुन्ना उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत याने जयेश पवार यांना जीवे मारण्याची धमकी देत गोळीबार केला होता. एक गोळी जयेशच्या डोक्याला व दुसरी छातीला लागल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला धुळ्यात उपचारार्थ हलवण्यात आले होते. तरुणाच्या पत्नीने या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन आरोपींना अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश टाक यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. विशेष तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक भौतीक पुरावे संकलित केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे 25 नोव्हेंबर रोजी पियुष उर्फ विकी दिलीप पाटील याला ताब्यात अटक करण्यात आली व चौकशीत त्याने गुन्ह्यातील मुख्य आरोपी मुन्ना उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत (कजगाव) याने गोळीबार केल्याची माहिती दिल्यानंतर त्यासदेखील अटक करण्यात आली.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, हवालदार नरेंद्र विसपुते, रवींद्र पवार व दीपक पाटील यांच्या पथकाने केली.
