निकृष्ट कामामुळे पुलाचे छत कोसळले
सुदैवाने प्राणहानी टळली : यावल तालुक्यातील घटना
यावल : तालुक्यातील एका निर्माणधीन पुलाचे छत कोसळल्याची घटना तालुक्यातील डोंगरकठोरा ते सातोद वड्री या सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या जंगल परीसरात रविवारी घडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही वा प्राणहानी झाली नाही. असे असलेतरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभारही उघड झाला असून या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
पुलाचे छत कोसळल्याच्या प्रकारामुळे बांधकाम विभागाच्या वतीने यावल तालुक्यात सुरू असलेल्या शासकीय निधीच्या इतर विकास कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. डोंगरकठोरा ते सातोद वड्री या सातपुड्याच्या पायथ्याशी या पुलाचे काम सुरू असतानाच पुलाचे छत टाकण्याचे काम करण्यात आल्यानंतर अवघ्या काही तासातच या पुलाचे छत अचानक कोसळून जमीनदोस्त झाले. सुदैवाने त्यावेळी तिथं काम करणार्या मजुरांपैक्की कुणीही हजर नसल्याने मोठी प्राणहाणी टळली मात्र पुलाचे छत कोसळल्याच्या निमित्ताने यावल तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कशा प्रकारे निकृष्ठ प्रतीची कामे होत आहेत याचा प्रत्यय आला आहे. वरीष्ठ स्तरावरून या प्रकाराची चौकशीची मागणी होत आहे.

