भुसावळात सात लाखांची धाडसी घरफोडी


महिला बाहेरगावी गेल्याची चोरट्यांनी साधली संधी : साडेतीन लाखांच्या रोकडसह दागिन्यांवर डल्ला

भुसावळ : घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी साडेतीन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून सुमारे सात लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना सोमवारी शहरातील शिवपूर-कन्हाळा रोडवरील वैष्णवीनगरात घडली. या प्रकरणी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात प्रतिमा महेंद्र मगरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घर बंद असल्याची संधी चोरट्यांच्या पथ्थ्यावर
प्रतिमा मगरे या एकट्याच शिवपूर कन्हाळा रोडवरील वैष्णवी नगराजवळील सिद्धी विनायक आय.टी.आय.जवळील स्वतःच्या घरात राहतात. त्यांचे पती महेंद्र मगरे हे पोलिस दलात असताना काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले तर एकुलता एक मुलगा मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. मगरे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन असल्याने 20 मार्च रोजी त्या घराला कुलूप लावून मुलाकडे गेल्या होत्या मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने त्या मुंबईतच अडकल्या व घराला कुलूप असल्याची नेमकी संधी चोरट्यांना चालून आल्यानंतर त्यांनी घराच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश करीत साडेतीन लाखांची रोकड, 12 तोळे वजनाचे दागिने, घरातील एसी व टीव्ही आदी साहित्यावर डल्ला मारला. रविवारी मगरे यांच्या घराशेजारील शेजार्‍याला मगरे यांच्या घरात लावलेल्या एसीचे आऊट डोअर युनिट नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मगरे यांना दूरध्वनी करून चोरी झाल्याची शक्यता वर्तवली व मगरे या सोमवारी आल्यानंतर घराची पाहणी केली असता त्यात चोरी उघ झाली. रात्री उशिरा त्यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिकार्‍यांची धाव
चोरीची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, नाईक समाधान पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांनी घरातील साडेतीन लाखांची रोकड, 12 तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच एसी व टीव्ही मिळून सहा लाख 92 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !