नियमावली डावलत खोट्या कागदपत्रांद्वारे चेअरमन, व्हा.चेअरमन निवड ?
भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटीतील प्रकार : आठ संचालकांची तक्रार
यावल : तालुक्यातील भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटी या संस्थेची नियमावली डावलून सेक्रेटरी यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे संस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड केली, असा अरोप संस्थेच्या आठ संचालकांनी धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे तक्रारीद्वारे केल्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. भालोद, ता.यावल येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच 1 जुन 1922 रोजी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल शाळा आहे. त्यावेळचे आद्य शिक्षक मुरारी रामजी चौधरी यांच्या सहकार्याने ती चालू झाली होती. या संस्थेस कायमस्वरूपी मान्यता 14 ऑगस्ट 1928 रोजी मिळाली आहे व तालुक्यातील सर्वांत मोठी ही संस्था आहे. या संस्थेच्या गत निवडणुकीत माजी खासदार कै.हरीभाऊ जावळे यांचे पॅनल निवडून आलेले होते व ते संस्थेचे अध्यक्ष तर प्रतिस्पर्धी पॅनलचे अनिल सुधाकर चौधरी हे उपाध्यक्ष व नितीन वासुदेव चौधरी हे सेक्रेटरी म्हणून निवडून आले होते. अध्यक्ष असलेले जावळे यांच्या निधनानंतर सेक्रेटरी नितीन चौधरी यांनी विद्यमान चेअरमन दिलीप हरी चौधरी यांना व सहकार्यांना विश्वासात न घेता 3 सप्टेंबर 2020 रोजी खोटी सभा घेतली. संस्थेच्या दप्तरात फेरफार करून खोटे रेकॉर्ड तयार केले व खोटे प्रोसेडींग तयार करीत चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड केली. ही निवड करतांना त्यांनी सोसायटीच्या चेअरमन दिलीप हरी चौधरी, व्हाईस चेअरमन हेमलता मुरलीधर इंगळे, कार्यकारीणी सदस्य गणेश गिरधर नेहते, नारायण शशिकांत चौधरी, भास्कर देविदास पिंगळे, नितीन लहू चौधरी, अरुण रामदास चौधरी व इच्छाराम लिलाधर चौधरी या आठ संचालकांना अंधारात ठेवून अनधिकृतपणे चेअरमन म्हणून लिलाधर विश्वनाथ चौधरी यांची निवड जाहीर केली. ही निवड प्रक्रिया अनधिकृत असल्याची तक्रार वरील आठ संचालकांनी धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे केली आहे. या तक्रारीमुळे तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
विरोधी गटाचे षडयंत्र
अल्पमतातील विरोधी गटातील सदस्य ही संस्था गिळंकृत करण्याचा षड्यंत्र रचले असून संस्थापक होण्याच्या प्रयत्नात आहे. सेक्रेटरी नितीन चौधरी यांनी वर्षानुवर्षे कार्यकारीणीची मीटिंग बोलावलेली नाही. हिशोब सुद्धा दाखवत नाही संस्थेच्या निधीचा गैरवापर करीत असल्याचे तत्कालीन चेअरमन दिलीप हरी चौधरी म्हणाले.

निवड कायदेशीरच
अध्यक्ष कै.जावळे यांच्या निधनानंतर घटनेनुसार उपाध्यक्षांकडे पदभार आहे, माजी चेअरमन हे मिटींग घेवू देत नव्हते, मिटींग रद्द करीत होते व नोटीस अजेंडा फाडून टाकत होते व मिटींगला गैरहजर राहुन संस्थेला वेठीस धरत होते. संस्थेच्या महत्वाच्या निर्णयांकरीता मिटींग व चेअरमन, व्हा.चेअरमन निवड आवश्यक होती. अध्यक्षांच्या सुचनेवरून संस्थेच्या घटनेनुसार निवड ही कायदेशीर असून त्यांचे आरोप खोटे आहे. उलट अपहारासंदर्भात कै. जावळे यांनी माजी चेअरमन व माजी सेक्रटरी यांच्या चौकशीकरीता समिती नेमली असल्याचे सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव नितीन चौधरी म्हणाले.

