वीज कंपनीच्या मनमानीला जिल्हा ग्राहक मंचचा ‘शॉक’
भुसावळच्या ग्राहकाला भरपाईसह बिल कमी करण्याचे आदेश
भुसावळ : वीज कंपनीच्या मनमानी कारभाराचा एरव्ही प्रत्यय सर्वसामान्य ग्राहकांना नवीन नाही मात्र लॉकडाऊनच्या आधीच्या काळातही वीज मीटरचे रीडींग न घेता अवाजवी बिल पाठवून ग्राहकाला मनस्ताप देणार्या वीज कंपनीला जिल्हा ग्राहक मंचने चांगलाच दणका दिला आहे. ग्राहकाला मानसिक त्रासापोटी खर्चासह तक्रारीचा खर्च व सरासरी पाठवण्यात आलेले अवाजवी वीज बिल रद्द करण्याचे आदेश यापुढे नियमित रीडींग घेवून सरासरी शंभर युनिटप्रमाणे वीज बिल देण्याचे आदेश दिले आहेत. आठवडेभरात आदेशाची पूर्तता करण्याचेही आदेशात नमूद आहे.
वीज कंपनीला ग्राहक मंचचा असाही दणका
झाले असे की, भुसावळच्या खडका रोड भागातील रहिवासी व रेल्वेतील तिकीट निरीक्षक अफसर खान मेहमूद खान यांना वीज कंपनीकडून जानेवारी ते मार्च 2020 या काळात रीडींग न घेता 14 हजार 160 रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले व त्यापैकी ग्राहकाने सात हजारांचा भरणा वीज खंडित न होण्यासाठी केला. अवाजवी बिलाबाबत ग्राहकाने तक्रार करूनही दाद मिळाली नाही शिवाय बिलही कमी झाले नसल्याने ग्राहकाने जिल्हा ग्राहक मंचात अॅड.राजेश उपाध्याय यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात आला. वीज कंपनीने ग्राहकाला पाठवलेले 14 हजार 160 रुपयांचे वीज बिल रद्द करून यापुढे सरासरी शंभर युनिटप्रमाणे वीज बिल द्यावेत तसेच यापूर्वी भरलेले सात हजार पुढील बिलात वळती करावेत शिवाय तक्रार अर्जापोटी ग्राहकाला दोन हजार तसेच मानसिक त्रासापोटी तीन हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश मंचाचे अध्यक्ष व्ही.व्ही.दाणी यांनी दिले. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात तक्रार दाखल झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तक्रारीचा निकाल लागला. तक्रारदारातर्फे भुसावळचे अॅड.राजेश उपाध्याय यांनी युक्तीवाद केला.


