घोडसगाव पोलिस पाटलांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
मुक्ताईनगर : तालुक्यातील घोडसगाव जवळ सरविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घोडसगाव येथील शर्मा यांच्या हॉटेलजवळ सहा वर्षाची मुलगी एका 45 वर्षाच्या संशयीत हालचाली करीत असलेल्या इसमाजवळ असल्याचे कळताच घोडसगाव पोलिस पाटील श्रीराम खोटे यांनी लागलीच पोलिस उपनिरीक्षक निलेश सोळंके यांना फोनद्वारे माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक निलेश सोळंके यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या ताफ्यासह घोडसगाव येथे पोहोचून संशयीत इसम व सहा वर्षाची मुलगी यांना ताब्यात घेऊन मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आणले. संबंधीत इसमाची चौकशी केल्यानंतर अल्पवयीन सहा वर्षीय बालिका जळगाव (जामोद), जि.बुलढाणा येथे असल्याची व तिला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली. संशयीत इसम संजय दामोदर मांडोकार (वाघोळा, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) यास जळगाव जामोद पोलिस ठाण्यातील अधिकार्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस पाटलांनी दाखवलेल्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपनिरीक्षक निलेश सोळंके यांनी पोलिस पाटील श्रीराम खोटे, अॅड.विनोद इंगळे, आकाश थाटे, अजय शर्मा आदींचे कौतुक केले.

