शिंदे गटात गेलेले भुसावळातील 11 नगरसेवक लवकरच अपात्र होणार ! मंत्री संजय सावकारे यांचे मोठे विधान
चौधरी बंधूंच्या भूमिकेवर चालवले टीकेचे बाण ः पक्ष प्रवेशावरही ठेवले बोट
गणेश वाघ
भुसावळ (बुधवार, 8 सप्टेंबर 2026) : भुसावळातील राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला असलातरी आगामी काळात हे नगरसेवक अपात्र होतील, असा दावा भुसावळात मंत्री संजय सावकारे यांनी केला. चौधरी बंधूंच्या भूमिकेवरही त्यांनी टीकेचे जोरदार बाण चालवले. नगराध्यक्षा अपात्र झाल्या असून त्यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांना दिलासा मिळेल, असे त्यांना वाटत असलेतरी पुढे-पुढे पहा? काय-काय होते? असे सूचक विधानही त्यांनी करीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
भुसावळात काँक्रिट रस्त्याचे लोकार्पण
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते सुभाष पोलीस चौकी ते खडका रोड चौफुली रस्त्याचे सोमवारी सायंकाळी लोर्कापण करण्यात आले. याप्रसंगी मंत्री संजय सावकारे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
11 नगरसेवक लवकरच अपात्र होणार !
मंत्री संजय सावकारे यांनी माजी आमदार संतोष चौधरी व माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींच्या भूमिकेवर बोट ठेवत सांगितले की,
‘हे’ कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नाही व तेथेदेखील (शिंदे गट) राहतात की नाही हेदेखील लवकरच जनतेला कळणार आहे. पक्ष बदलला म्हणून आम्ही वाचू म्हणून हे तेथे गेले आहेत मात्र स्वतःला तीसमारखा समजणार्यांनी पुढे-पुढे पहा काय-काय होते ते? असे सूचक विधान सावकारे यांनी करीत खळबळ उडवून दिली. नगराध्यक्षा तर आधीच अपात्र झाल्या आहेत मात्र हे सर्व 11 नगरसेवकही लवकरच अपात्र होतील, असा दावा मंत्री सावकारे यांनी केला.
नेहमीच माझा विरोध
मंत्री सावकारे म्हणाले की, मी आयुष्यात चौधरी बंधूंच्या विरोधात कधी षडयंत्र रचले नाही की पोलिसांना कधी त्यांच्याविषयी फोनही केला नाही मात्र त्यांनी माझ्या विरोधात नेहमीच भूमिका घेतली. मी चांगले काम करतो त्यामुळे माझे चांगलेच होते, जो दुसर्याचे वाईट करतो त्याचे वाईटच होते, असेदेखील प्रसंगी सावकारे यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर मंत्री संजय सावकारे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेवक राजेंद्र आवटे, शोभा इंगळे, नगरसेवक आसीफ खान उर्फ मका, संतोष दाढी, हाजी शरीफ ठेकेदार, आशिक खान शेर खान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

