मिडीयाचा मुहूर्त हुकला ! ; आता खडसेंच्या अधिकृत मुहूर्ताची प्रतीक्षा
गुरूवारी राष्ट्रवादी प्रवेशाची कार्यकर्त्यांमधून चर्चा : खडसेंच्या भूमिकेकडे लागले लक्ष
मुक्ताईनगर : भाजपाकडून गेल्या चार वर्षांपासून डावलण्यात येत असलेले हेवी वेट नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत गुरुवार, 22 रोजी प्रवेश करीत असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने दिले होते व त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला खडसे हे घटस्थापणेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र नंतर खडसे यांनी माध्यमांनी हे मुहूर्त ठरवल्याचे सांगत वेळ मारून नेली तर अलिकडे कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या पोस्ट व व्हिडिओ व्हायरल केले व गुरुवारी प्रवेश होत असल्याचे सांगून मुहूर्तही सांगून टाकला मात्र प्रत्यक्षात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी याबाबत अधिकृतरीत्या काहीही जाहीर केले नाही, जे करेल ते सांगून करेल, लपून-छपून करणार नाही, अद्यापही मी भाजपातही, अशीच भूमिका त्यांनी मांडली आहे. दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे भाजपा सोडून जाणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
गुरुवारी वा शुक्रवारी फायनल प्रवेश
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या, बुधवार, 21 रोजी खडसे हे निवडक कार्यकर्ते व कन्या अॅड.रोहिणी यांच्यासह मुंबईत जातील व सदस्यत्वाचा राजीनामा देवून बुधवारी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. काही तांत्रिक अडचण असल्यास हा सोहळा एक दिवस लेट अर्थात शुक्रवारी होईल मात्र खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश हा निश्चित असल्याचा दावा आता कार्यकर्ते करीत आहेत.


कार्यकर्त्यांचे होर्ग्डिंग्ज चर्चेत
खडसेंवर झालेल्या अन्यायामुळे कार्यकर्तेदेखील प्रचंड व्यथीत आहेत शिवाय ते राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेनंतर सोमवारी निष्ठावंत कार्यकर्ते संदीप देशमुख व युवराज पाटील मित्र मंडळाने भाऊ, तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण अशा आशयाचा फलक सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरला झाला. विशेष म्हणजे या बॅनरवर ना भाजपाचे चिन्ह आहे ना राष्ट्रवादीचे त्यामुळे या बॅनरचीदेखील चांगलीच चर्चा रंगली आहे. सोमवारी दिवसभर मुक्ताईनगरातील खडसेंच्या फार्म हाऊसवर दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली होती.
