विधान परीषद धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून भाजपाचे अमरीशभाई पटेल विजयी
शिरपूर : महाराष्ट्र विधान परीषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून भाजपाचे अमरीशभाई रसिकलाल पटेल विजयी झाले आहेत. पटेल यांना 332 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी अभिजीत मोतीलाल पाटील यांना 98 मते मिळाली तर चार मते बाद झाली.
अमरीशभाई पटेल विजयी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अमरिशभाई रसिकलाल पटेल (भारतीय जनता पार्टी) विजयी झाले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अभिजित मोतीलाल पाटील यांचा पराभव केला. पटेल यांना 332 तर पाटील यांना 98 मते मिळाली. चार मते अवैध ठरली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते पटेल यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


1 रोजी झाली निवडणूक
महाराष्ट्र विधान परीषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर, 2020 रोजी मतदान झाले. त्यानंतर आज सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात मतमोजणीला सुरवात झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक सोनिया सेठी, जिल्हाधिकारी संजय यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे (नंदुरबार) उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो) यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी यादव यांनी विजयी उमेदवार पटेल यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर पटेल यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे, जिल्हा परीषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, निवडणूक निरीक्षक सोनिया सेठी उपस्थित होत्या.

