बहिणाबाई चौधरी स्मारकासाठी निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करणार


अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर : निसर्गकन्या बहिणाबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

मुक्ताईनगर : जीवनाचा सार अतिशय साध्या व बोली भाषेत मांडणार्‍या निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाबाई ब्रिगेडतर्फे बहिणाबाई उद्यान, जळगाव येथे बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यास जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र भैय्या साहेब पाटील, बहिणाबाई बिग्रेड प्रदेशाध्यक्ष माजी महापौर आशा कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बहिणाबाईंचे काव्य समर्पक : अ‍ॅड.रवींद्र पाटील
यावेळी रविंद्र भैय्या पाटील म्हणाले की, बहिणाबाई चौधरी यांचे काव्य हे आपल्या ग्रामीण भाषेत असल्यामुळे सर्व साधारण व्यक्तीला सुद्धा त्याचा अर्थ कळतो. अतिशय समर्पक असे बहिणाबाई यांचे काव्य आहे ज्यातून त्यांनी जीवनातील चढ उतार, सण उत्सव यांचे वर्णन केले आहे.

सरळ सोप्या भाषेतून मांडले जीवनाचे तत्वज्ञान
अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर म्हणाल्या की, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी अतिशय सोप्या सरळ भाषेतून अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे काव्य रचले आहे. त्यांच्या काव्यातून आपली मातृभाषा जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकर्‍यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग – या सार्‍यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती, असे त्यांच्या काव्यातून दिसून येते. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषी जीवनातील विविध प्रसंग अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत ज्यातून आपली ग्रामीण भागातील रूढी-परंपरा यांची माहिती पुढील पिढीला होत राहते.असोदा येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकाचे काम अपूर्णावस्थेत असून प्रदीप भोळे, किशोर चौधरी हे त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. स्मारकाला निधी मिळावा यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारक समिती सदस्य यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करून काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी आसोदा येथील संतोष रामा साळवे यांना राष्ट्रीय कालिदास शिल्पकला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अखिल भारतीय लेवा युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, राष्ट्रवादी माजी महानगराध्यक्ष परेश कोल्हे, अशोक लाडवंजारी, अजय बढे, पांडुरंग नाफडे, सुदाम पाटील, अखिल चौधरी, सुनीता येवले, साधना लोखंडे, हर्षा बोरोले, अतुल महाजन, निखील रडे, हर्षल चौधरी, कार्तिक तळेले, धीरज पाटील, विवेक जावळे, सुरेश फालक, अविनाश भोळे उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !