बर्ड फ्लूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी
मुंबई : बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरीकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परीस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात घेतला.
यांची होती उपस्थिती
यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अतिरीक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपास्थित होते.


राज्यातील जिल्हाधिकार्यांना निर्देश
ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेवून नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले. या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर3ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येइल. त्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. ज्या भागात बर्डफ्लू रोगाची लागण नाही अशा भागात अंडी व मांस 70 डीग्रीपेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नसल्याचे नमूद करून याबाबत गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पशुसंवर्धन विभागाकडून बर्ड फ्लूबाबत क्षेत्रीय अधिकार्यांना मार्गदर्शक सूचना
पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणले की, परभणीत 843 कोंबड्या, ठाण्यात बगळे व इतर पक्षी मिळून 15, रत्नागिरीत 9 कावळे यांचे बर्ड फ्लू अहवाल एच5 एन1 व बीड येथील 11 कावळ्यांचा अहवाल एच 5 एन 8 असा आला आहे. उर्वरित ठिकाणचे अहवाल भोपळहून प्राप्त व्हायचे आहेत. पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्लू मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय अधिकार्यांना पाठविल्या आहेत. केंद्र शासनाच्या उपाययोजनांच्या कृती आराखड्याप्रमाणे क्षेत्रीय अधिकार्यांना व्हीसीद्वारे या सूचनांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. 7 जानेवारीपासून कंट्रोल रूम स्थापित केले असून मृत पक्षांची माहिती घेणे सुरू आहे. पक्षांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे अशाही सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
