भुसावळात 46 आरोग्य कर्मचार्यांना मिळाली कोरोना लस
भुसावळ : कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड लस जिल्ह्यात प्राप्त झाल्यानंतर शनिवारपासून आरोग्य सेवकांना ती देण्याच्या कामाला सुरूवात झाली. भुसावळा पहिल्याच दिवशी 46 आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयातील वॉर्डबॉय रोहिदास शहादू चव्हाण या कर्मचार्यास आरोग्य कर्मचारी लता वानखेडे यांनी कोविशील्डचा पहिला डोस दिला. पहिल्याच दिवशी 100 जणांना डोस देण्याचे नियोजन होते मात्र 46 आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात आली तर 12 कर्मचार्यांनी केंद्रावर येवून लस नाकारली.
12 कर्मचार्यांचा लस घेण्यास नकार
शहरातील पालिकेच्या महात्मा फुले आरेाग्य केंद्रात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता व्हॅक्सीनेशनला सुरुवात झाली. व्हॅक्सीनेशन पूर्वी सकाळी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी भेट दिली. गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या निर्मूलनासाठी फ्रंट लाईनवर राहून काम करणार्या आरेाग्य, पालिका, पोलिस अधिकारी व कर्मचार्यांची टाळ्या वाजवून या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला. यावेळी अतिरीक्त जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, यावलचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.हेमंत बर्हाटे, ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.मयुर नितीन चौधरी, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संगिता पांढरे, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तौसीफ खान, महात्मा फुले आरेाग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.आर्शिया खान, वॅक्सीनेटर लता वानखेडे आदी उपस्थित होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 46 जणांना लसीकरण झाले केंद्रावर आल्यानंतर 12 जणांनी लस घेण्यास नकार दिला.



