सावद्याहून तब्बल सहा वर्षांनी केळीची दिल्लीत निर्यात
सावदा : केळीसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या बनाना सिटी सावदा येथून केळी माल धक्क्यावरून तब्बल सहा वर्षानंतर केळीची दिल्लीत निर्यात करण्यात आली. सुरुवातीला 12 जानेवारी रोजी दिल्लीला व्हीपीयु प्रकारच्या सहा वॅगन्स या प्रायोगिक तत्त्वावर दिल्लीला पाठवण्यात आल्याने त्यात यश आल्याने व व्यापार्यांचा चांगल्या प्रतिसाद लाभल्याने शनिवार., 16 रोजी 18 वॅगन्स पाठवण्यात आल्या. यावलसह तांदलवाडी, वाघोदा, फैजपूर, सावदा, निंभोरा व रावेर येथील तब्बल डझनभर व्यापार्यांनी एका बॉक्समध्ये 13 किलोप्रमाणे चौदाशे एक्सपोर्ट बॉक्समध्ये 23 टन केळीची तर काही व्यापार्यांनी मोकळ्या केळीच्या घडाप्रमाणे एका वॅगन्समध्ये 21 टन केळी अशी एकूण 44 टन म्हणजेच सुमारे चार हजार चारशे क्विंटल केळी दिल्लीकडे रवाना झाली.
किसान रेल्वे आझादपूर मंडीवर पोहोचणार
सावदा येथून केळी घेवून वॅगन्स भुसावळकडे रवाना झाले व तेथून हे वॅगन्स भरूच, गुजरात येथून फळे व भाजीपाल्याने भरलेल्या किसान रेल्वेला जोडून दिल्लीतील आजादपुर मंडी रेल्वे स्थानकावर पाठवल्या जाणार आहेत.
सावदा येथून प्रथमच एव्हढ्या मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट बॉक्समध्ये केळी भरुन दिल्लीला रवाना करण्यात आली. यापूर्वी 2014 मध्ये रेल्वे रॅकमध्ये सुटे घड व कॅरेटमध्ये केळी रेल्वेने दिल्लीला पाठवण्यात आली होती.

रेल्वे भाड्यात निम्मे तफावत
आधी दिल्ली ते सावदा रेल्वेचे भाडे एका वॅगनसाठी सुमारे 69 हजार 800 रुपय आकारले जात होते परंतु किसान रेल्वे अंतर्गत सावदा ते दिल्ली 23 टनसाठी सवलती दिल्यामुळे तेच भाडे अर्ध्यावर आले असून आता 36 हजार 140 रुपये भाडे आकारले जात आहे. रेल्वेने भाडे कमी केल्यामुळे याचा थेट फायदा व्यापार्यांना होणार आहे.
मागणी मोठ्या प्रमाणात मात्र रेल्वेकडून पुरवठा कमी
भारत सरकारच्या किसान रेल्वे योजनेंतर्गत सावदा ते दिल्ली 23 टनसाठी एका वॅगनचे भाडे 36 हजार 140 रुपये असून मात्र तेच भाडे रस्ते वाहतूक मालट्रक द्वारे करायचे झाल्यास 10 टन साठी 41 हजार रुपये लागते. भाड्यात दुप्पट तफावत असल्यामुळे व्यापार्यांकडून रेल्वे वॅगन्सची मोठ्या प्रमाणात मागणी होत असून मागणीच्या 50 टक्के एव्हढीच वॅगन्स सध्या उपलब्ध होत आहेत त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे व पुरेपूर वॅगन्स उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी व्यापार्यांनी केली आहे. वॅगन्स उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात केळी निर्यात होईल तसेच रेल्वेल देखील मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळणार आहे.
20 तासात दिल्लीत पोहोचणार केळी
मालट्रकने दिल्लीला केळी पाठवायची झाल्यास सुमारे 70 तासांचा अवधी लागतो तर रेल्वेने दिल्लीला केळी पाठवायची झाल्यास 20 तासांचा अवधी लागतो त्यामुळे वेळ व पैसा याचा व्यापार्यांना पुरेपूर फायदा होणार आहे तसेच केळीदेखील ताजीच दिल्लीला पोहोचणार आहे. दरम्यान, सावदा येथून नियमित रेल्वे व्दारे होणारी केळी वाहतूक बंद झाल्यानंतर येथील मालधक्का ओस पडला होता मात्र 16 रोजी बर्याच काळ नंतर येथून रेल्वेने केळी रवाना झाल्याने हा मालधक्का पुन्हा एकदा गजबजलेला दिसला यामुळे येथील मजुरांच्या हातालादेखील काम मिळाले आहे.


