भुसावळातील गोळीबारप्रकरणी पाचही आरोपींना पोलिस कोठडी
भुसावळ : दरोड्याच्या उद्देशाने जळगाव रस्त्यावरील लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ लपून असलेल्या पाच दरोडेखोरांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळत त्यांच्याकडून दोन जिवंत काडतूसासह गावठी कट्टा व दरोड्याचे साहित्य जप्त केल्याची घटना शनिवारी रात्री 12 वाजेनंतर घडली होती. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


दरोड्याच्या प्रयत्नातील पाच आरोपी जाळ्यात
भुसावळ शहर पोलिसांच्या गस्तीपथकाला पाहताच आरोपींनी दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून आरोपी राकेश उर्फ डीडी राजू बारे (20), भूषण उर्फ टक्या यशवंत मोरे (20), विल्सन अलेक्झांडर जोसेफ (27), सागर आनंदा पारधे (30), ऑस्टीन शरद रामटेके (21, सर्व रा.हुडको कॉलनी, भुसावळ) यांना अटक करीत त्यांच्याकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस व दरोड्याचे साहित्य जप्त करीत दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.
जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट
घटनेच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी रविवारी शहर पोलिस ठाण्याला भेट देत आरोपींची सखोल चौकशी केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे उपस्थित होते.


