रावेर तालुक्यात प्रस्थापीतांना धक्का : नवख्यांना संधी
रावेर : तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीनंतर सोमवारी झालेल्या मतमोजणीत अनेक ठिकाणी प्रस्थापीतांना धक्का बसला तर अनेक ठिकाणी नवख्या उमेदवारांना मतदारांनी संधी दिली. तालुक्यातील रसलपूर, केर्हाळा बुद्रुक, धामोडी, निंबोल, ऐनपूर, तांदलवाडी, विवरा बुद्रुक, गहूखेडा, निंभोरा, या गावात अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणूक झाली. भाजपाने 30 जागांवर दावा केला आहे. नेरुळ येथील दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने ईश्वरचिट्ठीने काढून एकाला विजयी घोषित करण्यात आले. सोमवारी तहसील कार्यलयात 13 टेबलावरून 13 फेर्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालय व परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
निरूळमध्ये ईश्वरचिठ्ठीने उमेदवारा विजय
निवडणूक निरीक्षक विक्रम बादल, तहसीलदार उषाराणी देवगुणे मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवून होत्या. निरुळ येथील प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवार रवींद्र खैरे व समाधान खैरे यांना समान 131 मते मिळाल्याने रोशनी सूर्यवंशी या 11 वर्षाच्या मुलीच्या हस्ते ईश्वरचिट्ठी काढण्यात आली. त्यात समाधान खैरे यांचे नाव आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. जिल्ह्याचे लक्ष असलेल्या जिल्हा परीषद अध्यक्षांचे गाव असलेल्या मोरगावात माजी सैनिक जे.आर.पाटील यांनी प्रस्थापीतांना धक्का दिला. निंबोल येथील विजय पाटील हे 25 वर्षांपासून ग्रामपंचायतीचे सदस्य तर 20 वर्षांपासून उपसरपंच होते. राहुल पाटील यांनी प्रस्थापीत असलेल्या विजय पाटील यांच्याशी एकाकी लढत देत विजय मिळवला. जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन व बाजार समितीचे सभापती आणि सरपंच श्रीकांत महाजन यांचे वर्चस्व तांदलवाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा सिद्ध झाले आहे.

निरूळमध्ये ईश्वरचिठ्ठीने उमेदवाराचा विजय
एमपीडीए कायद्यानुसार नाशिक मध्यवर्ती कारागृहात असणार्या स्वप्नील मनोहर पाटील हे बक्षीपुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाले आहे.नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्वप्नील मनोहर पाटील हे मागील पाच महिन्यांपासून असताना त्यांनी कारागृहातून निवडणूक लढवत 291 मते घेत विजय मिळवला. प्रतिस्पर्धी उमेदवार संदीप उमाकांत महाजन यांना 77 मते मिळाली.


