लालपरी ही ग्रामीण भागाची जीवनदायनी : सुनील वानखेडे


भुसावळात विना अपघात सुरक्षित मोेहिमेचे उद्घाटन

भुसावळ : देशात रेल्वेचे जाळे असले तरी अनेक भागात रेल्वे पोहचू शकली नाही. ग्रामीण भागाची जीवनदायनी म्हणून बसकडे बघीतले जाते. शहर व ग्रामीण भागाची नाळ बसमुळे जोडली गेली आहे. बसचा प्रवास सुखकर असून विद्यार्थी, दिव्यांग, वयोवृध्द यांना बस भाड्यात विशेष सवलत देण्यात येते. सुरक्षीत प्रवासासाठी प्रसंगी वेळ लागला तरी खाजगी वाहतुकीपेक्षा बसच्या प्रवासाला प्रत्येक प्रवाशाने प्राधान्य दिल्यास अपघात टाळता येवू शकतात. परीवहन मंडळाला या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी मदत होईल. यामुळेच लालपरी ही ग्रामीण भागाची जीवनदायनी असल्याचे प्रतिपादन प्रवासी सुरक्षितता मोहिमेच्या उद्घाटनावेळी एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट महाराष्ट्र संचालक सुनील वानखेडे यांनी केले.

एक महिना सुरक्षितता मोहिम
भुसावळ आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळातर्फे विना अपघात सुरक्षितता मोहिम 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारीदरम्यान एक महिना राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटनाचा कार्यक्रम भुसावळ आगारात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भुसावळ आगार प्रमुख पी.बी.चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिस्ट महाराष्ट्रचे संचालक सुनील वानखेडे होते. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधिकारी जी.टी.देवरे, हेड मेकॅनिक पी.आर.चव्हाण, पी.के.पाटील, नितीन मोरे, वरीष्ठ लिपीक पी.टी.चौधरी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आर.एस.पाटील, निता कापसे, कामगार संघटना प्रसिध्दी सचिव धर्मराज देवकर आदि उपस्थित होते.


एस.टी.बस दळण-वळणाचे महत्वाचे साधन
पी.बी.चौधरी म्हणाले की, सर्वसामान्यांचे दळण-वळणाचे महत्वाचे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील लहानात-लहान खेड्यापर्यंत बसच्या माध्यमातून प्रवास होत असतो. बसमध्ये बसणार्‍या प्रत्येक प्रवाशाचा सुरक्षीत प्रवास झाला पाहिजे याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य महामार्ग परीवहन विभागाची असून परीवहन विभागाने नेमून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्यास प्रवाशांचा सुरक्षीत प्रवास होतो. यासाठी नियमांचा अवलंब केला पाहिजे प्रवाशांचे हित, सुरक्षीत प्रवास हेच महामंडळाचे ब्रीद असून महामंडळाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्यास निश्चीत पणे सुरक्षीत प्रवास होवू शकतो. येणार्‍या दररोजच्या अडचणीमधून मार्ग काढुन चांगल्यात चांगली सेवा प्रवाशांना दिली पाहिजे. यामुळे परीवहन महामंडळाच्या उत्पन्नात भर पडेल. यासाठी सर्वच कर्मचारी कसोशीने प्रयत्न करत असतात.

परीवहन मंडळावर आजही विश्‍वास दृषढ
कामगार संघटनेचे प्रदेश सचिव धर्मराज देवकर म्हणाले की, प्रवाशांचा आजही विश्वास परिवहन महामंडळावर दृढ आहे. लांब पल्ल्याचा प्रवास असो अथवा जवळचा प्रवास. यासाठी प्रवासी बसच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परीवहन महामंडळाने प्रवासी व कर्मचार्‍यांसाठी नियमावली दिली आहे. या नियमावलीचा तंतोतंत पालन केल्यास होणारे छोटे-मोठे अपघात टाळण्यास मदत होवू शकते. यासाठी सर्व कर्मचारी बांधवानी एकत्रीत येवून प्रयत्न केलेे पाहिजे. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ, विना अपघात सुरक्षितता मोहिमेचे कर्मचार्‍यांना बॅचेस वाटप व फलकाचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन मयूर तायडे यांनी तर आभार ए.पी.बुगले यांनी मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !