प्रेयसीसोबतच्या वादातून चुंचाळेत प्रियकराचे घर जाळले
दोघा आरोपींना यावल न्यायालयाने सुनावली 25 पर्यंत कोठडी
यावल : पोलिस कर्मचारी असलेल्या प्रेयसीशी झालेल्या वादानंतन पोलिस कर्मचारी तरुणीच्या कुटुंबीयांनी थेट संबंधीत प्रियकर मुलाचे घर जाळल्याची घटना तालुक्यातील चुंचाळेत सोमवारी घडली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी तरुणीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेतील दोघा आरोपींना मंगळवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
लग्नात झाला वाद
जनाबाई हरी पाटील (72, रा.चुंचाळे, ता.यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा नातु शरद अशोक पाटील (रा.जळगांव रामेश्वर कॉलनी) याचे गावातील रहिवासी तथा रत्नागिरी पोलिस दलातील तरुणीशी प्रेमसंबध आहेत. रविवारी जनाबाई यांच्या चुलत नात वैशाली हिचे लग्न चुंचाळे येथे असताना या लग्नात त्यांचा नातु शरद पाटील हादेखील आला होता. लग्न मंडपात शरदचचा प्रेयसीशी वाद झाल्यानंतर प्रियसीचे वडील जुम्मा हसन तडवींसह फिरोज जुम्मा तडवी, अफरोज जुम्मा तडवी, मुमताज जुम्मा तडवी यांनी शरद पाटील यास शिवीगाळ करीत मारहाण केली. या भांडणात अफरोज तडवी याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने शरदच्या डाव्या पायाच्या टाचेवर मारुन पायास दुखापत केली व जुम्मा तडवी व फिरोज जुम्मा तडवी यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी लग्नात वाद नको म्हणून भांडण मिटवत नातू शरद पाटील हा जळगावी निघुन गेला तर दुपारी 4.30 वाजेला पुन्हा जेवणाची पंगत सुरू असतांना जुम्मा हसन तडवी हा त्याच्या हातात लाकडी दांडा व पेट्रोलची कॅन घेवून आला व सोबत फिरोज जुम्मा तडवी, अफरोज जुम्मा तडवी, मुमताज जुम्मा तडवी, आरीफा संजु तडवी, संजु तडवी पूर्ण नाव माहित नाही (सर्व रा.चुंचाळे) आदींनी घरातील कॉटवर, शोकेसवर, घरातील कपड्यावर पेट्रोल टाकून देत घरास आग लावल्याने सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी सात संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघा आरोपींना पोलिस कोठडी
गुन्हा दाखल झाल्यानंतर जुम्मा हसन तडवी (35) व अफरोज जुम्मा तडवी (22, दोघे रा.चुंचाळे) यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर मंगळवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे सरकारी वकील अॅड.नितीन खरे यांनी बाजू मांडली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक जितेंद्र खैरणार, हवालदार संजय तायडे, सुनील तायडे, नितीन चव्हाण आदी करीत आहे.


