निमखेडीत पोलिसांवर दगडफेक : नऊ आरोपींना अटक


राष्ट्रपुरूषांचा पुतळा हटवल्यानंतर जमाव संतप्त : सहा.निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी : जिल्हा पोलिस अधीक्षकांसह अधिकार्‍यांची धाव

मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे राष्ट्रपुरूषांचा विनापरवानगी पुतळा मध्यरात्री बसवण्यात आल्यानंतर मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस व प्रशासनाने गावात धाव ग्रामस्थांची समजूत काढली मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसताना अचानक दगडफेकीला सुरूवात झाल्याने सहा.निरीक्षकांसह दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर जिल्हाभरातून कुमक मागवण्यात आली तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांसह अपर पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ संशयीतांना अटक करण्यात आली.

मध्यरात्री बसवला छत्रपतींचा पुतळा
गावातील मुख्य चौकात चबुतरा बांधून मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला मात्र सकाळ होताच मुक्ताईनगर पोलिसांना ही बाब कळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, सहा.पोलिस निरीक्षक नीलेश सोळुंके, कैलास भारास्के, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार प्रमोद झांबरे आदींनी सकाळी नऊ वाजता गावात धाव घेत संतप्त जमावाची समजूत काढली मात्र पुतळा हटवण्यास ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत असतानाच अचानक दगडफेकीला सुरुवात झाल्याने वरणगावचे सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे कर्मचारी विजय कचरे, आर.सी.पी.प्लाटूनचे कर्मचारी मोहसीन शेख यांना दगड लागल्याने ते जखमी झाले. जखमींना तातडीने जळगावी उपचारार्थ हलवण्यात आले.


जिल्हा पोलिस अधीक्षकांची धाव
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी गावात भेट दिली ग्रामस्थांना शांतता ठेवण्याचे आवाहन करीत दोषींवर कठोर कारवाईचे आश्‍वासन दिले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, महेंद्र मोंधाळे, राजेंद्र कांडेलकर यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास निमखेडी खुर्द गावात जाऊन ग्रामस्थांची समजून घातली.

पुतळा जप्त : नऊ आरोपींना अटक
पोलिसांनी विधीवत पूजा केल्यानंतर पुतळा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करताच काही वेळ तणाव पसरला मात्र पोलिसांनी परीस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात हवालदार संजीव पाटील यांच्या फिर्यादीनुसार आरोपी दीपक बाबूलाल डहाके, गजानन दिनकर घोगरे, अतुल विलास डहाके, मंगेश रामकृष्ण मराठे, सतीश सुधाकर डहाके, देवेंद्र रमेश डहाके, कैलास विठ्ठल डहाके, अरविंद भीमराव लोमटे, मंगल फरदडे यांच्यासह तीन अल्पवयीन संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन वगळता वरील आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी अनेक लोकांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !