भुसावळातील दरोड्याच्या गुन्ह्यात हंसराज खरातसह तिघे सहआरोपी
संशयीतांनी गावठी कट्टा दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना पुरवल्याची पोलिसांची माहिती
भुसावळ : शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ दरोड्याच्या प्रयत्नातील पाच आरोपींनी शहर पोलिसांनी अटक केली होती. अटकेपूर्वी आरोपींनी हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस चौकशीत आरोपींना हा कट्टा हंसराज खरात, अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्ना तसेच एका अल्पवयीन संशयीताने पुरवल्याची बाब पुढे आल्याने तिघा आरोपींना दरोड्याच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
रेल्वे पार्किंगमध्ये कट्ट्याच्या धाकावर मागितली होती खंडणी
भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये काम करणार्या तरुणास गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करून दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणीपोटी हप्ता देण्याची मागणी केल्याप्रकरणी हंसराज खरात व अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्नासह एका अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता. बुधवार, 6 जानेवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. आरोपींच्या अटकेनंतरही त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या कट्ट्याची माहिती न दिल्याने पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध कलमात वाढ करण्यात आली होती.

दरोड्याच्या गुन्ह्यात तिघांना केले सहआरोपी
रविवारी मध्यरात्री लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ आरोपी राकेश उर्फ डीडी राजू बारे (20), भूषण उर्फ टक्या यशवंत मोरे (20), विल्सन अलेक्झांडर जोसेफ (27), सागर आनंदा पारधे (30), ऑस्टीन शरद रामटेके (21, सर्व रा.हुडको कॉलनी, भुसावळ) हे आरोपी दरोड्याच्या तयारीत असताना शहर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपींनी दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याने आरोपींकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले होते. आरोपींच्या पोलिस चौकशीत त्यांनी गावठी कट्टा कट्टा हंसराज खरात, अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्ना तसेच एका अल्पवयीन संशयीताने दिल्याची कबुली दिल्यानंतर दरोड्याच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपींची बुधवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.


