भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या 178 विद्यार्थ्यांना डेल, टीसीएस आणि इन्फोसिसमध्ये संधी
भुसावळ : अभियांत्रिकी शिक्षणामुळे तंत्रज्ञानाच्या कक्षा झपाट्याने विस्तारल्या जात आहे. याला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. अभियांत्रिकी क्षेत्राच्या परीघातही असे अनेकविध नवे बदल दिसून येत आहे. मुलींचादेखील या क्षेत्राकडे ओढा वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम क्षेत्रातसोबत कॉम्प्युटर, यांत्रिक, सिव्हिल आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजीलाही आगामी काळात महत्व असेल, असे मत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी मांडले. हुवाई या नामांकित कंपनीने 47 विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग आयोजित केली होती. या समारोपाच्या प्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी महाविद्यालयाचे डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.सुधीर ओझा, डॉ.पंकज भंगाळे, डॉ.गिरीष कुळकर्णी, डॉ.दिनेश पाटील, प्रा.अविनाश पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा.इझाक पॉल, प्रशिक्षक प्रा.राम अग्रवाल, प्रा.अनिकेत पाठक उपस्थित होते.

डेल, टीसीएस आणि इन्फोसिसमध्ये नोकरीची संधी
उद्योग जगताला पूरक मनुष्यबळ पुरविण्याचे प्रयत्न सामंजस्य कराराच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अत्याधुनिक अभ्यासक्रमानुसार व्दितीय वर्षांपासून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या मागणीनुसार प्रशिक्षण उपलब्ध केले आहे. यासाठी डेल, टीसीएस आणि इन्फोसिस इन्फोसिस तर्फे महाविद्यालयातील 178 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतील अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा.इझाक पॉल यांनी दिली.
गत 10 वर्षात अभियांत्रिकी वर्तुळात मोठे बदल
गत 10 वर्षात अभियांत्रिकी वर्तुळात मोठे बदल झाले आहे. अभ्यासक्रम स्मार्ट झाला आहे. मात्र अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव जाणवतो. उद्योगक्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञानामुळे सातत्याने होणारे बदल हे तळागाळातील लोकांपर्यंत आवश्यकतेप्रमाणे पोहोचविण्याचे कार्य केले जाईल. विद्यार्थ्यांना विविध तंत्र, कौशल्ये आत्मसात करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहे. उद्योगांच्या आवश्यकतेप्रमाणे कमी कालावधींचे सर्टिफिकेट कोर्सेस प्रशिक्षणार्थींना उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे. व्यक्तिमत्त्व चाचणी, बोलण्यात आत्मविश्वास, सत्यता, निर्णय क्षमता, समयसूचकता व नेतृत्वक्षमता तपासली जात असल्याचे प्रा.सुधीर ओझा यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांनी संयमाने सातत्यपूर्ण अभ्यास करण्याचे आवाहन प्रा.इझाक पॉल यांनी केले आहे.


