यावलमधील अल्पवयीन बालिकेचा विवाह : काझीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
यावल : शहरातील बोरावल गेट परीसरात अल्पवयीना बालिकेचा विवाह लावल्याप्रकरणी विवाह लावणार्या काझी तसेच मुलीच्या आई-वडीलांसह अल्पवयीन मुलीचा पती व त्याच्या आई-वडिलांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
महिला बालविकास अधिकार्यांनी दिली फिर्याद
15 वर्ष तीन महिने वय असलेल्या अल्पवयीन बालिकेचा विवाह लावल्याप्रकरणी जिल्हा बालसंरक्षण सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या कार्यालयात 11 जानेवारी रोजी तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची चौकशी करण्यात आल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने अल्पवयीन मुलीचे वडील राजु पटेल, आई जरीना राजु पटेल (कंडारी, साकरे, ता.धरणगाव), विवाह लावणारे काझी हाजी समद पटेल (बोरावल गेट, यावल), शाहरूख राजु पटेल तसेच मुलाचे आई-वडील यांच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अल्पवयीन मुलीचा चोपडा शहर पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक अजित सावळे यांनी 19 रोजी जवाब नोंदवला. या प्रकरणी यावल बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी यावल पोलिसात तक्रार दिल्यावरून वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी संजय तायडे करीत आहेत.



