भुसावळात अवैध वाहतूक करणारा डंपर पकडला
प्रांताधिकार्यांनी केली कारवाई : अडीच लाखांचा दंड
भुसावळ : शहरासह तालुक्यात अवैध गौण खनिजाची जोमात वाहतूक होत असतानाच प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बंब कॉलनी भागात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे डंपर पकडत संबंधित मालकास अडीच लाखांचा दंड सुनावल्याने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली.
साकेगावसह अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
शहरासह तालुक्यात अहोरात्र गौण खनिजाची वाळूची चोरटी वाहतूक सुरू असताना स्थानिक तलाठी, तहसीलदार व प्रांताधिकार्यांकडून ठोस कारवाई होत नसल्याने अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणार्यांचे चांगलेच भावले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही याबाबत आवाज उठवला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे वाळू वाहतूकदारांचे खबरी शहराच्या वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच शहराकडे प्रवेश करणार्या नाक्यांवर पाळत ठेवून असल्याने अधिकारी रस्त्यावर आहेत वा नाही याची आधीच वाळू वाहतूकदारांना खबर मिळत असल्याने कारवाई होत नाही वा झालीच तरी ती अपवादात्मकरीत्या होताना दिसून येते. साकेगावजवळील वाघूरसह तापी नदीपात्रातून बेकायदा वाळूची उत्खनन होत असून वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणावर लाखो रुपये किंमतीच्या वाळूचे साठे केल्याने त्याबाबत जिल्हाधिकार्यांनीच जागृक होवून दखल घेण्याची अपेक्षा आहे.

प्रांतांच्या कारवाईने खळबळ
गुरुवारी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी के.आर.ठाकूर, कंडारी ठाकूर डी.एम.पवार यांनी बंब कॉलनी परीसरात मनोज परदेशी (साकेगाव) यांचा डंपर (एम.एच.04 ई.वाय.3215) वर कारवाई करीत तहसील कार्यालयाच्या आवारात उभे केले. दरम्यान, अपवादात्मक कारवाईऐवजी प्रशासनाने कारवाईत सातत्य राखावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असून रात्रीच्या वेळी चोरटी वाळू वाहतूक थांबवण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


