भुसावळात हद्दीच्या वादात खड्डे मात्र कायम
भुसावळ : हद्दीच्या वादात मृतदेहाच्या अवहेलना नवीन नाहीत मात्र थेट शहरात रस्त्यांचे खड्डे बुजवताना हद्दीचा प्रश्न उपस्थित होत असल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. जळगाव रस्त्यावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापासून जळगाव रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम गुरूवारपासून पालिकेकडून सुरू झाले असलेतरी अगदी पाच फुटाच्या अंतरावरील खड्डा न बुजविताच ठेकेदाराकडून पुढे काम सुरू करण्यात आल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला. हद्दीच्या वादात मात्र मुख्य रस्त्यावरील खड्डे कायमच राहिल्याने दखल घेण्याची अपेक्षा आहे.
मुहूर्त गवसूनही खड्डे मात्र कायम
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापासून ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यापर्यंतच्या मार्गावरील खड्डे बुजविणे, रस्त्याला पॅच मारण्याचे काम गुरूवारी सकाळी सुरू झाले मात्र जेथून काम सुरू केले तेथून अवघ्या पाच फूटावर असलेले मोठे खड्डे बुजविण्याचे रस्त्याचे काम करणार्या कर्मचार्यांनी टाळल्याने नागरीकांनी दोन्ही खड्डे बुजविण्याबाबत संबंधितांना विनंती केली मात्र ते आमचे काम नाही, आमच्या कामाची हद्द येथून आहे, असे सांगत ते खड्डे बुजविण्याचे टाळले. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. पालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



