अल्पवयीन मुलीचा विवाह : साक्षीदारांसह मौलवीदेखील आरोपी
यावल : शहरातील बोरावल गेट येथे 25 ऑगस्ट 2020 रोजी राजू लतीफ पटेल यांचा मुलगा शाहरुख राजू पटेल याचा विवाह कंडारी (ता.धरणगाव) येथील 15 वर्ष 3 महिने वयाच्या बालिकेसोबत झाल्याप्रकरणी यावल पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्ह्यात आणखी तीन संशयितांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. आधी लग्न लावून देणारा मौलवी हाजी समद असे नाव फिर्यादीत नमूद होते मात्र निकाह प्रक्रीयेत या नावाची व्यक्ती आढळली नाही. लग्न लावून देणारे मौलवी अब्दुल रहेमान तसेच निकाहासाठी गवाह असणारे मुस्तकिम पटेल व जाकीर मुसा पटेल (दोघे रा.भावेर, ता.शिरपूर) या तिघांचा सहभाग असल्याचे समोर आल्याने त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. दरम्यान, नवरा मुलगा शाहरूख पटेल याने जवाबात लग्न लावणार्या मौलवीचे नाव लपवून गावातील हाजी समद यांचे खोटे नाव जबाबात दिल्याची बाब तपासात उघड झाली आहे.


