वरणगावातील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रासाठी 81 कोटी खर्च मंजूर


आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश : 461 पदे भरली जाणार

भुसावळ- तालुक्यातील हतनूर (वरणगाव) येथे राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) गट क्रमांक 19 च्या प्रशिक्षण केंद्रासाठी विविध संवर्गातील 461 पदे निर्माण करण्यास शुक्रवारी राज्य शासनाने मान्यता दिली. यासाठी आवर्ती खर्च 19 कोटी नऊ लाख 12 हजार, अनावर्ती खर्च 81 कोटी 1 लाख 97 हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

81 कोटींची तरतूद
पोलिस प्रशिक्षण केंद्र, हतनूर (वरणगाव) येथे राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 19 ची स्थापन करण्यास शुक्रवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 461 पदे निर्माण करण्यास शुक्रवारी मंजुरी मिळाली. राज्य राखीव बलाच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण 81 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जमीनीसाठी 3 कोटी 55 लाख, प्रशिक्षण केंद्र बांधकामासाठी 7 कोटी 66 लाख , निवासस्थान बांधकामासाठी 2 कोटी 79 लाख, मैदाने विकसित करण्यासाठी रक्कम 52 लाख, शस्त्रात्रांसाठी 6 कोटी 23 लाख, दारूगोळासाठी 1 कोटी 16 लाख, वाहनांसाठी 14 कोटी 72 लाख, रस्ते बांधकामासाठी 15 कोटी व इतर अनुषंगीक बाबींसाठी 30 कोटी रुपये असा एकूण 81 कोटी रुपयांच्या अनावर्ती खर्च मंजूर झाला.

पाठपुराव्याला आले यश -आमदार
हतनूर येथील नियोजित जागेवर पोलिस प्रशिक्षण केंद्राची गरज नव्हती त्यामुळे शेतकर्‍यांना जागा परत द्या अन्यथा जागेचा काही उपयोग करावा या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याने राज्य राखीव बल गट निर्माण करण्याला शासनाने मंजुरी देत आता प्रत्यक्षात निधी मंजूर केला असून लवकरच आता कामाला सुरूवात होणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. विविध पदे भरली जाणार असून या माध्यमातून बेरोजगार युवकांना नोकरीची संधी मिळणार असल्याचेही आमदार म्हणाले.


कॉपी करू नका.