भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीसांसह 53 पदाधिकार्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
जळगावात प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत हातावर बांधले घड्याळ : 12 माजी नगरसेवकांसह सात नगरसेविका पतींनी केला प्रवेश
जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा दौर्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी लेवा पाटीदार भवनात भुसावळातील तब्बल 53 पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश करणार्यांमध्ये भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांच्यासह 12 माजी नगरसेवकांसह सात नगरसेविका पतींचा समावेश आहे.


यांची होती उपस्थिती
प्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, अरुणभाई गुजराथी
माजी आमदार सतीश अण्णा पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे, माजी आमदार दिलीप वाघ, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे आदींची उपस्थिती होती.
आगामी राजकारणाकडे लागले लक्ष
माजी आमदार संतोष चौधरी व माजी मंत्री खडसेंमध्ये अनेक वर्षांपासून असलेले वितुष्ट खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे संपले आहे तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपातील विद्यमान पदाधिकार्या कुटुंबातील सदस्यांनी शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यामुळे भुसावळातील आगामी राजकारण कुठल्या वळणावर असेल याबाबत आतापासून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. माजी आमदार आता नेमकी काय भूमिका घेतात? याकडेही लक्ष लागले आहे.
यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
माजी नगरसेवक चिराग कुरेशी, जलील कुरेशी, शेख पापा शेख कालू, शेख निवाम, इस्माईल अकबर मेमन, अजीम खान खलील खान आदींसह भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी भारती भोळे, स्वीकृत नगरसेवक प्रा. सुनील नेवे, भाजपचे गट नेते मुन्ना तेली यांचे चिरंजीव आशिक तेली, भाजपचे माजी शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अनिकेत पाटील, माजी उपनगराध्यक्षा शे. सईदा यांचे पती शेख शफी आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पालिका निवडणुकीला अद्याप आठ-नऊ महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे यापूर्वी भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या खडसे समर्थक नगरसेवकांनी तूर्त अपात्रतेची कारवाई न होण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश टाळला असलातरी निवडणूक तोंडावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील यात शंकाच नाही.
भुसावळ ऐवजी जळगावात प्रवेश
भुसावळातील तेली समाज मंगल कार्यालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र खडसे समर्थकांनी भुसावळऐवजी जळगावात प्रवेश केल्याने भविष्यात चौधरी गट व खडसे गट कार्यान्वीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
